गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांची मदत घेण्याचे अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडू लागली असून बहुसंख्य नागरिक मुखपट्टीविनाच सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत. करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मुखपट्टीविना फिरणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई करणारे कर्मचारी आणि पथकांच्या संख्येत वाढ करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

यांनी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

दिवाळीनिमित्त मुंबईतील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक प्रचंड गर्दी करू लागले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अत्यंत धोकादायक असल्यामुळे पालिका अधिकारी चिंतित झाले आहेत.

बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कशी नियंत्रणात आणायची, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. खरेदीसाठी येणारे बहुसंख्य नागरिक मुखपट्टीचा वापर करीत नाहीत. तसेच काही जण योग्य पद्धतीने मुखपट्टी परिधान करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन दंडात्मक कारवाई अधिक तीव्रतेने करण्याचे आदेश चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आयुक्तांचे निर्देश

* केवळ प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून चालणार नाही, तर पालिकेच्या इतर विभागांतील अधिकाऱ्यांची विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. गर्दीची ठिकाणे निश्चित करावीत आणि तिथे कारवाई करणारी पथके तैनात करावीत.

* संसर्ग पसरू नये या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवावी आणि वेळप्रसंगी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. त्याचबरोबर जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी.

* सर्व परिमंडळीय उपायुक्त आणि विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांनी वरील आदेशांचे प्राधान्याने काटेकोरपणे पालन करावे.