News Flash

बालकांसाठी मुंबईत पालिकेचे   ५०० खाटांचे ‘जम्बो करोना केंद्र’

तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त त्रासदायक ठरेल, असे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.

|| संदीप आचार्य

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोनाचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, हे तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन ५०० खाटांचे लहान मुलांचे स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येणार असून याशिवाय सहा हजार खाटांची तीन स्वतंत्र जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आयुक्तांनी राबवलेल्या करोना नियंत्रण कार्यक्रमाची दखल घेत जम्बो केंद्र उभारणीसह अत्यावश्यक बाबींसाठी ५० कोटी रुपयांचा निधी कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी (सीएसआर) निधीतून देण्यात आला आहे.

पालिकेच्या तब्बल २० हजार खाटांच्या रुग्णालयांसाठी प्राणवायूनिर्मितीही पालिका स्वत:च करणार असून यापुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर प्राणवायूसाठी अवलंबून राहावे लागणार नाही, असेही आयुक्त चहल यांनी सांगितले.

तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त त्रासदायक ठरेल, असे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर बैठक झाली. यात लहान मुलांवरील उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.

मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे लहान मुलांसाठी जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. एक वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना येथे दाखल केले जाणार असून लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यापैकी ७० टक्के प्राणवायू खाटा असतील तर २०० अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. हे लहान मुलांचे जम्बो कोविड केंद्र ३१ मे पूर्वी उभे करण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय प्रत्येकी दोन हजार खाटांची आखणी तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्याचे काम सुरु झाले आहे. यातील एक मालाड येथे तर सायनच्या सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील. आताची चारही जम्बो कोविड रुग्णालये उभारताना त्याचा आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रात गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिकच्या खाटा उभारता येणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

मेअखेर व जून च्या मध्यावधीपर्यंत  साडेसहा हजार अतिरिक्त खाटांची जम्बो कोविड रुग्णालये उभी राहातील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. सध्या पालिकेच्या डॅशबोर्ड वर २२ हजार खाटा दिसत असून लवकरच ही संख्या ३० हजार खाटांपेक्षा जास्त झालेली दिसेल असेही आयुक्त म्हणाले.

अनेक कंपन्या व उद्योग समूह मुंबई महापालिकेला करोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबई महापालिकेला ‘सीएसआर‘ मधून केवळ पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता अवघ्या दोन दिवसात ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून तीन मोठे उद्योग लवकरच त्यांची मदत जाहीर करणार असल्याचे  चहल यांनी सांगितले. यापैकी ३५ कोटी रुपये एकट्या ‘एचडीएफसी‘ने जाहीर केले असून यातून ऑक्सिजन प्लांट तसेच वरळीचे जम्बो केविड रुग्णालय उभे केले जाणार आहे. याशिवाय डिझ्ने व स्टार वाहिनीचे माधवन यांनी लंडन येथून दूरध्वनी करून साडेबार कोटी रुपयांचे ९० व्हेंटिलेटर देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. आगामी काळात एकूण ११ जम्बो कोविड रुग्णालये असतील. या रुग्णालयात सुमारे २० हजार खाटा असणार आहेत व ही सर्व रुग्णालये ऑक्सिजन १०० टक्के बाबत स्वयंपूर्ण असतील, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 1:22 am

Web Title: mumbai municipal corporation jumbo corona center for children akp 94
Next Stories
1 ‘ना विकास क्षेत्रां’तील बांधकामांबाबतच्या केंद्राच्या परिपत्रकाला स्थगिती
2 अनुकंपातत्त्वावरील नोकरीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे हेलपाटे
3 नव्या शैक्षणिक वर्षातही शुल्ककपातीचा आग्रह
Just Now!
X