पहिल्या तिमाहीत पालिकेच्या उत्पन्नात घट; तिजोरीत केवळ ९६६.३० कोटींची भर

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदी आणि करोना निर्मूलनात लागलेली सर्व यंत्रणा यांमुळे चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल ३,९८३.२५ कोटी रुपयांची तूट आली असून तिजोरीत केवळ ९६६.३० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकला. या तुटीचा फटका पालिकेने हाती घेतलेल्या मोठय़ा प्रकल्पांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले प्रकल्प, भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्याची टिप्पणी पालिकेच्या प्रमुख लेखापालांनी पालिका आयुक्तांना सादर केली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये मुंबई महापालिकेचा २०१०-२१ या आर्थिक वर्षांचा ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महिन्याभरातच मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागला आणि टाळेबंदी, संचारबंदी लागू झाली. तेव्हापासून आजतागायत पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज करोनाविषयक कामात व्यस्त आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या महसूल वसुलीवरही झाला आहे.

चालू आर्थिक वर्षांत (२०२०-२१) पालिकेला जकातीपोटी नुकसानभरपाई, मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य, गुंतवणुकीवरील व्याज, जल व मलनिस्सारण आकार, राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान साहाय्य, पर्यवेक्षण आकार आणि इतर स्रोतांतून २८,४४८.३० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत म्हणजे ३० जून २०२० रोजी ४९४९.५५ कोटी रुपये उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होईल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात ९६६.३० कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. पहिल्याच तीन महिन्यांत पालिकेच्या उत्पन्नात ३,९८३.२५ कोटी रुपयांची तूट आली आहे.

देशभरात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकातकर बंद करण्यात आला. तूर्तास सरकारकडून जकात करापोटी भरपाई मिळत आहे, मात्र काही वर्षांनी ती बंद करण्यात येणार आहे. आता मालमत्ता कर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. गतवर्षांच्या (२०१९-२०) अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ५,०१६.१९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट पालिकेला गाठता आलेले नाही. पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज सध्या बेघर, बेरोजगार, विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींना अन्नपदार्थ पाकिटांचे वाटप करण्यात व्यग्र आहे. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली होऊ शकलेली नाही. करोनाकाळात बांधकाम व्यवसायही मंदावल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उत्पन्नाचा स्रोत असलेल्या विकास नियोजन शुल्क आणि अधिमूल्यापोटीही पहिल्या तिमाहीत पालिकेला फारसा महसूल मिळू शकलेला नाही. परिणामी, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेसमोर यंदा अर्थसंकट उभे राहण्याचे चिन्हे आहेत.

प्राधान्यक्रम निश्चित करा

पालिकेने मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प, मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता, धोकादायक पुलांची तसेच रस्ते दुरुस्ती आदी विविध कामे हाती घेतली आहेत. यासाठी मोठय़ा निधीची पालिकेला गरज आहे. असे असताना पहिल्या तीन महिन्यांत पालिकेचे उत्पन्न गडगडले आही. ही बाब लक्षात घेऊन विविध विभागांनी हाती घेतलेले प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्पांचा विचार करावा, तसेच प्रकल्पांबाबत प्रधान्यक्रम निश्चित करावा, असे प्रमुख लेखापालांनी आपल्या टिप्पणीत म्हटले आहे.