उपनगरीय लोकल गाडीने प्रवास करणारे मुंबईकर आपले सण-उत्सवही या लोकलमध्येच साजरे करत असतात. मात्र विरार येथे राहणाऱ्या एका महिलेची प्रसुतीच लोकल गाडीच्या डब्यात झाली. गेल्या तीन महिन्यांत लोकलमध्ये प्रसुती होण्याची ही दुसरी घटना आहे. फुलपाडा, विरार येथे राहणाऱ्या माला चौधरी (३०) या आपल्या सासुसह कांदिवली येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयात जाण्यासाठी विरारहून पहाटेच्या लोकलने निघाल्या. मात्र गाडी भाईंदर स्थानकात पोहोचत असताना त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या. त्यांनी गाडीतच मुलाला जन्म दिला. महिला सहप्रवासी आणि लोहमार्ग पोलीस यांच्या मदतीने ही प्रसुती सुखरूप झाली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णवाहिकेतून कांदिवली येथे डॉ. आंबेडकर रुग्णालयात रवाना केले.
तापमानात पुन्हा वाढ
मुंबई: निलोफर वादळामुळे गेले तीन दिवस असलेले ढगाळ वातावरण मंगळवारी निवळले. त्यामुळे तापमानातही वाढ होऊन सांताक्रूझ येथे ३४.५ अंश से. तर कुलाबा येथे ३४ अंश से. तापमानाची नोंद झाली. वादळामुळे पुन्हा वातावरण ढगाळ होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. अरबी समुद्रातील निलोफर चक्रीवादळाचा प्रवास उत्तरेकडे सुरू झाला आहे. या वादळामुळे मुंबई- कोकणात ढगांची दाटी झाली होती व कमाल तापमानही सहा ते सात अंश उतरले होते. मात्र हे वादळ उत्तरेला सरकत असल्याने कोकण किनारपट्टीवरील ढग विरळ झाले आहेत. त्यामुळे तापमान पुन्हा एकदा वाढू लागल्याचे हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान २९ अंश से. होते. मंगळवारी त्यात पाच अंश सेल्सिअसची वाढ झाली. निलोफर वादळ गुजरातजवळ सरकू लागल्यावर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार १ नोव्हेंबरला हे वादळ उत्तर गुजरातच्या किनाऱ्यावर थडकणार आहे.  
समुद्रात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबई: घरी न सांगता पोहायला गेलेल्या एका शालेय विद्यार्थ्यांचा जुहू समुद्रात बुडून मृत्यू झाला. कार्तिक सुधासमुथ्थू (१३) असे या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळला. विलेपार्ले येथील नेहरू नगरच्या लक्ष्मीबाई चाळीत राहणारा कार्तिक नववीत शिकत होता. सोमवारी दुपारी दोन वाजता तो मित्राकडे जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. चार वाजेपर्यंत घरी परतेन असे त्याने घरी सांगितले होते. मात्र तो मित्रांसमवेत जुहू समुद्रात पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी जुहू पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याचा शोध घेत असताना वर्सोवा येथील किनाऱ्याजवळ मंगळवारी सकाळी कार्तिकचा मृतदेह आढळला. पोहण्यापूर्वी कार्तिकने कपडे किनाऱ्यावर काढून ठेवले होते. त्यावरून त्याची ओळख पटली.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
मुंबई: घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मालकास पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. फैजल दफेदार (५३) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी कर्नाटकातील म्हैसूर येथे राहणारी आहे. घाटकोपर येथे राहणाऱ्या फैजल दफेदार (५३) याने महिन्याभरापूर्वी तिला घरकामासाठी आणले होते. फैजल याचा घाटकोपर येथे कारखाना आहे. घरात कुणी नसताना फैजल तिच्याशी अश्लील चाळे करायचा. रविवारी मध्यरात्री पुन्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अखेर या मुलीने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी दफेदरला बलात्कार आणि बाललैंगिक शोषण विरोधी कायद्याअन्वये (पोक्सो) अटक केली आहे. पीडित मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपी दफेदर याला १ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दागिने चोरणारा नोकर अटकेत
मुंबई: तब्बल ३० लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झालेल्या नोकरास पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट किल्लीने कुलूप उघडून त्याने कारखान्यातील हे दागिने लंपास केले होते. विशेष म्हणजे चोरी करण्याच्या अवघ्या सहा महिन्यापूर्वी हा नोकर कामावर रूजू झाला होता.  कानाईलाल मल यांचा अब्दुल रेहमान स्ट्रीट येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. सहा महिन्यांपूर्वी शेखर बेरा (३३) हा कारागीर त्यांच्याकडे कामाला लागला होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा होता. तो या कारखान्यात दागिन्यांना हिरे बसविण्याचे काम करायचा. मात्र ११ ऑक्टोबर रोजी त्याने बनावट किल्लीने कारखान्यातील २५ लाखांचे हिरे आणि सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्याच्याबद्दल कुठल्याच प्रकारची माहिती फिर्यादीकडे नव्हती. पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कवळेकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात लपलेल्या शेखरला अटक केली. त्याने चोरलेले दागिने आणि हिरे तेथील एका जमिनीत पुरून ठेवले होते.
सिग्नल बिघाडामुळे ट्रान्स हार्बर विस्कळीत
मुंबई :मध्य रेल्वेमार्गावरील हार्बर मार्गापेक्षाही उपेक्षित असलेल्या ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या प्रवाशांची दैना सुरू आहे. या मार्गावर सिग्नल यंत्रणेतील बिघाडांच्या घटनेत वाढ झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी तुर्भे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि या मार्गावरील वाहतूक तासाभरासाठी खोळंबली. परिणामी दोन सेवा रद्द झाल्या, तर पूर्ण वाहतूक अध्र्या तासापेक्षा जास्त उशिराने पुढे सरकत होती. ठाणे-वाशी मार्गावर तुर्भे स्थानकाजवळ मंगळवारी संध्याकाळी ७.१० वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्ण बंद होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. घरी परतण्यासाठी स्थानकांवर आलेले प्रवासी आधीच गर्दीने ओसंडलेले प्लॅटफॉर्म पाहून काढता पाय घेत होते. मध्य रेल्वेने अखेर संध्याकाळी ८.१५च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त केला.