मोटारसायकली चोरून रात्रभर धूम स्टाइलने भरधाव चालवणाऱ्या ११ अल्पवयीन मुलांना वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या़ मौजमजेसाठी ते मोटारसायकली चोरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रात्री भरधाव गाडय़ा हाकणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रमझानच्या काळात ही मुले मोटारसायकली चोरून रात्रभर मौजमजा करण्यासाठी दक्षिण मुंबईत फिरत असत. पेट्रोल संपल्यानंतर मोटारसायकली तिथेच सोडून निघून जात असत, अशी माहिती वरिष्ठ पो़ निरीक्षक सुहास गरूड यांनी दिली.

पूर्व मुक्त मार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी
मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून मुंबईच्या दिशेने येत असताना उजवीकडचे चाक अकस्मात निखळल्याने एका मोटारकारला अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे पूर्व मुक्त मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रोहित जैन पूर्व मुक्त मार्गावरून मुंबईच्या दिशेने येत होते. पुलावरून उतरताना गाडीचे चाक निखळले व गाडी दुभाजकावर आदळली. गाडीतील एअरबॅग कार्यरत झाल्याने त्यांना व सोबतच्या मित्राला इजा झाली नाही. मात्र पूर्व मुक्त मार्गावर दीड ते दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. गाडय़ांच्या रांगा लागल्या व झटपट पोहोचण्याचा विचार करणारे प्रवासी मध्येच अडकून पडले.