ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सविता केमिकल जंक्शन येथे ५५० मीटर लांबीचा तर घणसोली नाका ते तळवली नाका जंक्शन असा दीड किलोमीटर लांबीचा असे दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.तसेच महापे जंक्शनवरील वाहतुकीच्या प्रश्नावर उतारा म्हणून ५० मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्याशेजारी २०० मीटर लांबीचे जोडरस्तेही असतील. या कामांसाठी एकूण १२३ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दोन वर्षांत हे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधून पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
ठाण्याहून वाशी, नवी मुंबई, पनवेल, पुण्याकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या वाहनांना या प्रकल्पांचा लाभ होईल.

गोदी कामगारांना १४ टक्के बोनस!
मुंबई : देशातील सर्व प्रमुख बंदर व गोदी कामगारांना २०१३-१४ या वर्षांसाठी १४.६० टक्के बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय नौकनयन मंत्रालयाने घेतला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी कामगारांना बोनसचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज युनियनचे सचिव मारुती विश्वासराव यांनी दिली. देशातील प्रमुख बंदरातील कामगगारांना उत्पादनाशी निगडीत बोनस देण्याचा करार २००७ मध्ये झाला आहे. त्यानुसार कामगारांना दर वर्षी बोनस देण्यात येतो. यंदा १४.६० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. बोनस पात्रतेसाठी ३५०० रुपये ही वेतन मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सरासरी ६१३२ रुपये कामगारांना मिळतील. गणेश चतुर्थी पूर्वीच बोनसचे  कामगारांना वाटप करण्यात येणार आहे, असे युनियनच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

भीक मागणाऱ्या दोन मुलांची सुटका
ठाणे: ठाणे स्थानक परिसरात भीक मागणाऱ्या दोन लहान मुलांची ठाणे पोलिसांच्या ‘चाईल्ड प्रोटेक्शन युनिट’ने शुक्रवारी दुपारी सुटका केली. दोघांना भिवंडीतील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यात एक आठ, तर १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात लहान मुले भीक मागताना दिसून येतात. अशा ठिकाणांचा सर्वेक्षण केले होते. त्याआधारे या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. ही दोन्ही मुले कळवा येथील मफतलाल परिसरात राहत असून त्या मुलाचे वडील स्थानक परिसरात बुट पॉलिशचे तर त्या मुलीची आई स्थानक परिसरात भीक मागते.

लाचखोर नगरसेविकेस एक दिवसाची पोलीस कोठडी
मुंबई : लाचखोरी प्रकरणात माहिमच्या प्रभाग क्रमांक १८१च्या नगरसेविका श्रद्घा पाटील आणि त्यांचे पती राजेश पाटील यांना शुक्रवारी विशेष न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पालिकेच्या स्वच्छता प्रबोधन अभियान राबविणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या चालकाकडून लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शुक्रवारी न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने पाटील दाम्पत्याला एक दिवसाची कोठडी सुनावली.