मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १५ टक्क्य़ांनी वाढ अपेक्षित आहे. नवीन १०० बालवाडय़ा, इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे नवे ११४ वर्गही सुरू करण्याचा पालिकेचा मानस असून त्यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये तरतूद होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शालोपयोगी २७ वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र सुगंधी दुध आणि चिक्कीपासून विद्यार्थ्यांना पुढील वर्षीही वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प २,४७२.५३ कोटी रुपयांचा होता. या अर्थसंकल्पात सुगंधी दुधासाठी १३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेमुळे सुगंधी दुधाचा पुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच दुधाऐवजी चिक्की देण्याची मागणी करण्यात आली होती.
‘केसी’ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव
मुंबई : चर्चगेट येथील ‘किशनचंद चेलाराम महाविद्यालया’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ८ फेब्रुवारीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि उद्योजक अनिल अंबानी यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे. ७ फेब्रुवारीला मरिन ड्राइव्ह परिसरात ६० दुचाकीस्वारांची विशेष मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, हैदाराबाद नॅशनल कॉलेजिएट बोर्डाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, प्राचार्य मंजू निचानी आदी मान्यवर उपस्थिती राहतील. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या उपस्थितीत केसीच्या सभागृहात विशेष कार्यक्रम होईल. यावेळी उद्योगपती व केसीचे माजी विद्यार्थी असलेले अनिल अंबानी देखील उपस्थित राहणार आहेत. ‘अवर युनिव्हर्स’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी होणार आहे.
अपंगांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
मुंबई : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी तब्बल ४०० कार्यकर्त्यांच्या मदतीने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या मलबार हिल येथील ‘मुक्तागिरी’ येथील निवासस्थानी अनपेक्षितरित्या घुसून सोमवारी ठिय्या आंदोलन केले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास आ. कडू आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मंत्र्यांच्या घरात घुसले. त्यांच्यासोबत प्रहार विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने होते. मोघे दिल्लीत असल्याने आंदोलनकर्त्यांना त्यांची भेट घेता आली नाही. दरम्यान, सामाजिक न्याय विभागाचे सचिव डी. आर. शिंदे यांनी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत तुमच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन शिंदे यांनी आंदोलकर्त्यांना दिले. मात्र, ‘या प्रकारची आश्वासने आम्हाला या आधीही देण्यात आलेली होती. त्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतले. परंतु, या मागण्यांवर सरकारने पुढे काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे, आम्हाला ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही,’ अशी प्रतिक्रिया प्रहार विद्यार्थी संघटनेचे मनोज टेकाडे यांनी व्यक्त केली.
महावितरणचा लाचखोर अधिकारी अटकेत
वार्ताहर, वाडा
वाडा तालुक्यातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास तीन हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी पकडले. सुनील जैन (३५) असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याने बोअरवेलसाठी वीज जोडणी देण्याकरीता मालोंडे येथील जीतेंद्र अनिल भोईर या शेतकऱ्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी भोईर यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस उपाधीक्षक ममता डिसोझा यांच्या पथकाने सोमवारी सुनीलला अटक केली.
छेडछाडप्रकरणी  विद्यार्थी ताब्यात
ठाणे : ठाणे शहरातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या मुलास ठाणेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो गेली सहा महिने या विद्यार्थीनीची छेड काढत असल्याची माहीती पोलीस तपासात पुढे आली आहे. येथील एका खासगी शाळेमध्ये पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिकते. तिच्या वर्गातील एक १५ वर्षीय मुलगा तिची छेड काढत होता. मागील वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकाराला कंटाळून त्या विद्यार्थीनीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या मुलास ताब्यात घेतले आहे.
तरुणाची हत्या
पनवेल : येथीस वाढत्या क्रिकेट संस्कृतीने रविवारी एका तरुणाचा बळी घेतला. सुनील कातकरी (३०) असे मृताचे नाव आहे. चिंचवण गावातील आदिवासी वाडय़ांतील सुनील, रवी गणपत कातकरी आणि मंडळींनी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. रविवारी सामने संपल्यानंतर उरलेल्या रकमेची पार्टी केल्यानंतर रवी आणि सुनील यांच्यात भांडण झाले. त्यात रवीने सुनीलच्या डोक्यात दगड मारला. त्यात सुनीलचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी रवीला अटक केली.