सुशांत मोरे

सुरक्षित अंतराबाबतच्या धोरणात एकवाक्यता नसल्याने मुंबई महानगरात एसटीला एक न्याय तर बेस्टला दुसरा असे चित्र सध्या रस्त्यावर दिसते आहे. एसटीला पूर्ण क्षमतेने चालविण्यास परवानगी असल्याने त्या प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या असतात, तर बेस्टला कागदावर तरी

केवळ ५० टक्के  प्रवासी क्षमतेत वाहतूक सेवा द्यावी लागते आहे. कारण बेस्टच्या काही मार्गावर बसगाडय़ांना खच्चून गर्दी होते, तर काही मार्गावर ५० टक्के   प्रवासी क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालक-वाहकांना प्रवाशांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे.

बेस्ट एका आसनावर एक प्रवासी आणि उभ्याने पाच प्रवासी या नियमानुसार चालवली जात आहे. पण अपुऱ्या फेऱ्या आणि प्रवाशांची गर्दी यांमुळे त्याचे काटेकोर पालन होत नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर तर अनेक बेस्ट बसगाडय़ांना गर्दी वाढली आणि सुरक्षित अंतराची नियमावली कागदावरच राहिली.

घाटकोपर आगार ते कळंबोली या बेस्टच्या मार्गावर असलेले वाहक अविनाश वाळके  सकाळी ७.३० वाजता कळंबोली येथून घाटकोपरला येताना बसला प्रचंड गर्दी असल्याचे सांगतात. प्रवासी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात आणि बसमध्ये एकच गर्दी करतात, ओ ते सांगतात. सांताक्रूझ मार्गावर बेस्टचे चालक सागर शिंदे यांनी मात्र शासनाच्या नियमाचे पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याचे सांगितले. सकाळी १०.२० वाजता निघणाऱ्या बसमध्ये एका आसनावर एकच प्रवासी घेतला जातो. परंतु कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने उभ्याने पाच प्रवासी घेण्याऐवजी किमान दहा ते पंधरा प्रवासी घेण्याशिवाय पर्याय नसतो, असे ते सांगतात.

प्रवाशांचा गोंधळ

बेस्टमध्ये अद्यापही एका आसनावर एक प्रवासी आणि उभ्याने पाच प्रवाशांचा नियम लागू आहे, परंतु बसगाडय़ांना प्रवासी प्रचंड गर्दी करतात. गर्दी होऊ नये म्हणून वाहकाने सुरक्षित अंतराच्या नियमाची आठवण करून दिली तरी त्यांनाही जुमानत नसल्याचे सांगितले. एसटीप्रमाणेच बेस्ट बसही पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्याबाबत अद्याप विचार न झाल्यानेचालक-वाहक आणि प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.

बेस्ट बसगाडय़ांना मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. अशा वेळी दोन प्रवासी एका आसनावर बसतात, मात्र काही मार्गावर एका आसनावर एकच प्रवासी घेऊन बस जातात. मुंबई महानगरात एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत असल्याने बेस्टनेही आता अशीच मुभा द्यावी.

– अरविंद नलावडे, प्रवासी