Mumbai plane crash: घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळलं असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दुर्घटनेची योग्य चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार राम कदमदेखील उपस्थित होते. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वैमानिक मारिया कुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला.

घटनास्थळाची पाहणी करुन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. दुर्देवात सुदैव एवढंच की बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी विमान पडल्याने आजुबाजूच्या इमारतींमधील रहिवासी सुखरुप आहेत. याप्रकरणी उड्डाण मंत्रालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. मीदेखील त्यांना विनंती केली आहे. अशा प्रकारचा अपघात होणं खूपच धोकादायक आहे’.

‘योग्य चौकशी आणि कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास आहे. कारण चूक कोणाची आहे ते समोर येणं गरजेचं आहे. आता काहीही म्हणणं घाईचं ठरेल’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.