वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातल्या पहिल्याच सामन्यावर संकट निर्माण झालं आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजचा भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत. ६ डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.

हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, मुंबई पोलिसांनी पहिल्या टी-२० सामन्याला सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. ६ डिसेंबररोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती, नुकत्याच आलेल्या अयोध्या निकालावरुन हा दिवस मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. याचसोबत ६ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात. त्यामुळे मुंबईतला सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात यावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधीने नुकत्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हजेरी लावली होती. या बैठकीत मुंबई पोलिसांची बाजू स्पष्ट करण्यात आली. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे MCA चे अधिकारी आणि पोलिस आयुक्तांमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.