मतदानाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवार, २४ एप्रिल रोजी विशेष दक्षता घेतली आहे. मतदान व निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासाठी बुधवारपासूनच वाहतूक व्यवस्थेत काही विशेष बदलही करण्यात आले आहेत. निवडणूक कर्मचारी आणि स्थानिक रहिवासीवगळता या भागांमध्ये इतर वाहनांना र्निबध आहेत.
बुधवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर गुरुवारी दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत वरळी भागात ना. म. जोशी, शिंगटे मास्तर ते गणाचार्य चौक हा परिसर वाहतुकीसाठी बंद राहील. डॉ. ई. मोजेस रोड, वरळी नाका ते दैनिक शिवनेरी जंक्शनपर्यंतचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद असेल.
भायखळा परिसरात २५ एप्रिलपर्यंत डॉ. नायर मार्ग ते बेबी गार्डन जंक्शन, बेबी गार्डन जंक्शन ते रेडक्रॉस लेन जंक्शन, उमरभाई पथ जंक्शन ते नायर मार्ग, वायएमसीए मार्ग ते रिबेक स्ट्रीट, डॉ. लीला मेलविल मार्ग जंक्शन ते बेबी गार्डन जंक्शन या भागात वाहने उभी करण्यास मनाई असून तेथे एकदिशा मार्गही राहील.
दादर भागात २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत एस. के. बोले मार्ग ते ज्ञानमंदिर जंक्शन ते हनुमान मंदिरापर्यंत, डिसिल्व्हा हायस्कूल ते कीर्तिचंद्र सुरिश्वरमहाराज चौक रानडे रोड, पानेरी चौक, स्टीलमॅन जंक्शनपर्यंत वाहतुकीवर र्निबध आहेत. एस. के. बोले मार्गाकडून रानडे रोडकडे जाण्यासाठी ज्ञानमंदिर जंक्शन, पी. एल. काळे मार्ग हा एकदिशा मार्ग असेल. या मार्गावर वाहने उभी करण्यास बंदी आहे.
दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी २५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत वाहतुकीवर र्निबध आहेत. काळबादेवी रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहने मेट्रो जंक्शनवरून एम. जी. रोड, बॉम्बे जिमखाना टोकावरून उजवे वळण, सोमानीमार्गे सीएसटीकडे जातील. सीएसटीकडून मेट्रोकडे जाणारी वाहने सीएसटीवरून डीएन रोड, पोलीस आयुक्तालयावरून डावीकडे, लोकमान्य टिळक मार्ग येथून मेट्रोकडे जातील. दहिसर पश्चिमेला २४ एप्रिलपर्यंत रुस्तमजी इराणी मार्गावर र्निबध आहेत. वामनराव भोईर मार्ग, सुधीर फडके उड्डाण पुलावरून जयवंत सावंतमार्गे (दक्षिणेकडून) रुस्तुमजी रॉयल इमारतीकडे प्रवेशबंदी आहे.