सर्व व्यवहार ईमेलद्वारे; अनावश्यक कामे कमी करण्याचा प्रयत्न

पोलीस ठाणे ते उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त तसेच आयुक्त कार्यालयात दैनंदिन टपाल घेऊन जाण्याची पद्धत आता बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी मुंबई पोलीस दलात अंतर्गत ईमेल सेवा कार्यान्वित करण्यात आली असून त्यानुसारच आता यापुढे पत्रव्यवहार होणार आहे. त्यासाठी सध्या आता सर्व पोलीस ठाण्यात संगणक प्रणाली नव्याने बसविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस शिपायांचे दररोजचे हेलपाटे बंद होणार आहेत.

पोलीस ठाणे आणि विविध कार्यालयांत होणारा दैनंदिन पत्रव्यवहार तसेच इतर फायलींसाठी एक ते दोन शिपायांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली असते. ९३ पोलीस ठाण्यातील दीडशे ते दोनशे पोलीस कायदा व सुव्यवस्थेऐवजी या कामाला जुंपले आहेत. हे पोलीस या जबाबदारीतून मुक्त होतील आणि ते पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध होतील, असा विश्वास पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला. दैनंदिन टपालासाठी पोलिसांचा वापर करणे अयोग्यच होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पूर्वी पोलीस नोटीस सहसा शिपायांना उपलब्ध होत नव्हती. आता पोलीस नोटीस ऑनलाइन करण्यात आली असून त्यासाठी किओस्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कुठल्याही पोलिसाला ती सहजगत्या उपलब्ध होणार आहे. याशिवाय पोलिसांच्या पगाराचा तपशीलही त्यांना लघुसंदेशाद्वारे लवकरच पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या खात्यात किती जमा आहे, याचीही त्यांना कल्पना येणार असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले.

पडसलगीकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलिसांना आठ तास डय़ुटी हवी, याला प्राधान्यक्रम दिला. सरसकट सर्वच पोलीस ठाण्यांना आदेश न देता टप्प्याटप्प्याने ही योजना लागू केली. आतापर्यंत ४४ पोलीस ठाण्यातील पोलिसांना आठ तास डय़ुटी प्रत्यक्षात अनुभवता येत आहे. ही संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. आठ तास डय़ुटी सर्वच पोलिसांना हवी आहे. केवळ स्टंट म्हणून हा निर्णय राबविण्यात आलेला नाही. ही योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मार्ग काढून ही योजना राबविली जात आहे, याकडे पडसलगीकर यांनी लक्ष वेधले.

पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यालाही आपण प्राधान्य दिले आहे. प्रादेशिक विभागात सध्या अशी शिबिरे सुरू आहेत. या काळातच दोन पोलिसांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार झाले, याकडे लक्ष वेधून पडसलगीकर म्हणाले की, पोलिसांना डब्यात काय जेवण द्यावे यासाठी पोलिसांच्या गृहिणींचे शिबीर घेण्यात आले होते. आहारतज्ज्ञांनी या गृहिणींना मार्गदर्शन केले.

पोलीस दलातील अनावश्यक कामे कमी करण्यावर आपला भर आहे. यासाठी वापरले जाणारे मनुष्यबळ कमी झाले तर प्रत्येक पोलीस ठाण्याला आपल्या पोलिसाला आठ तास डय़ुटी देणे सहजशक्य आहे. पोलिसांची डय़ुटी आठ तास झाल्यानंतर त्यांच्यावरील बराचसा ताण कमी होऊन त्याचे आणि कुटुंबाचेही स्वास्थ्य सुधारेल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाही नीट राखली जाईल.  – दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त