टाटा पॉवर कंपनीचा ५०० मेगावॉटचा वीजसंच बंद पडल्याने मंगळवारी दिवसभर मुंबईतील अनेक ठिकाणांना भारनियमन सोसावे लागले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात असा प्रकार क्वचितच घडला आहे. मात्र, मुंबईतील वीज पारेषण वाहिन्यांची मर्यादा आणि शहरात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांतील बेबनाव या दोन गोष्टी टाळता आल्या असत्या तर ही वेळ ओढवली नसती.
वीजसंच बंद पडल्याने चेंबूर-धारावी-कर्नाक बंदर या मार्गावरील वीज वाहिनीतून होणारा वीजपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत होण्यासाठी चेंबूर-सालसेट या पारेषण वाहिनीच्या मार्गाने बाहेरून वीज आणणे हा तोडगा होता. पण चेंबूर-सालसेट पारेषण वाहिनीची आणखी २५० मेगावॉट वीज आणण्याची क्षमता नाही. त्यामुळे या निमित्ताने मुंबईतील पारेषण वाहिन्यांची अपुऱ्या क्षमतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तीन वर्षांपूर्वी पारेषण वाहिन्यांच्या अपुऱ्या क्षमतेमुळे मुंबईत अंधार पसरला होता. त्याचीच पुनरावृत्ती झाली.  
‘टाटा पॉवर’कडे तेलावर चालणारा २५० मेगावॉटचा संच आहे. त्याची वीज प्रति युनिट १० रुपये २० पैसे इतकी महाग आहे. त्यामुळे तो बंद ठेवण्यात येतो. मंगळवारी अकस्मात विजेचा तुटवडा निर्माण झाल्यावर हा संच सकाळीच तातडीने सुरू करून दुपारनंतरचे भारनियमन टाळता आले असते. पण या महाग विजेचा भरुदड कोण सोसणार यावरून ‘टाटा पॉवर’-‘बेस्ट’ यांच्यात वाद रंगला. अखेर सायंकाळी उशिरा हा वीजसंच सुरू करण्याबाबत सहमती झाली. तसेच बिघाड त्यामुळे रात्री उशिरा परिस्थिती पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले.

रुग्णालयांनाही फटका
विद्युतपुरवठा खंडित झाल्याचा फटका पालिकेच्या लो. टिळक रुग्णालय तसेच टाटा स्मारक रुग्णालयालाही बसला. सकाळी लो. टिळक रुग्णालयातील विद्युतपुरवठा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास २० मिनिटांसाठी खंडित झाला होता. जनरेटरच्या साहाय्याने रुग्णालयातील इमर्जन्सी, अतिदशता विभाग तसेच व्हेंटिलेटर सेवा ३० सेकंदात सुरू झाली, असे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे म्हणाले. मात्र रुग्णालयातील इतर विभागातील कामकाज विद्युत पुरवठा नसल्याने विस्कळीत झाले. टाटा रुग्णालयातही सकाळी १५ मिनिटांसाठी विद्युत पुरवठा बंद झाला होता. मात्र संपूर्ण रुग्णालयासाठी पर्यायी वीजव्यवस्था असल्याने रुग्णालयाच्या कोणत्याही कामकाजावर परिणाम झाला नसल्याचे जनसंपर्क प्रमुख सय्यद जाफरी यांनी सांगितले.