दादर- माटुंगा दरम्यानच्या रेल रोकोसाठी रेल्वे मंत्री पियूष गोयल जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची एक टीम आंदोलनस्थळी पोहोचली आहे.

दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने तब्बल तीन तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेचे अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. शेवटी रेल्वे प्रशासनाला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. रेल्वे प्रशासन आता लेखी आश्वासन देण्याची तयारी दर्शवत आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींच्या वतीने देण्यात आली. मात्र, या आंदोलनासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयलच जबाबदार आहेत, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे. आम्हाला फक्त नोकरी हवी आहे, वन टाइम सेटलमेंट करावी, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. आम्ही हक्कासाठी हा लढा दिला, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मोदी तुम्ही प्रामाणिक असेल तर या मुलांना नोकरी द्या. गुजराती तरुणांनाही या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले, मग हा कुठचा विकास मॉडल, असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या आंदोलनाची तयारी कशी केली, याबाबत मात्र विद्यार्थ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?
१. २० टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.

२. रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक भुमीपुत्रांना व इतर राज्यातील भुमीपुत्रांना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे.

३. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वे सेवेत समाविष्ट करणे आणि भविष्यातही नियम लागू ठेवावे.

४. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची वन टाइम सेटलमेंट.

५. एका महिन्याच्या आत रेल्वे सेवेत समाविष्ट झालेच पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे नियम अटी लागू करु नये.