विविध कामांसाठी रविवारी ३ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर व हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील लोकल उशिराने धावतील. तर हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्दच करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ उड्डाणपुलाच्या पाडकामासाठीही शनिवारी रात्री दहापासून ब्लॉक घेण्यात येणार असून हे काम रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहील. यामुळे चर्चगेट ते दादरदरम्यान जलद मार्गावरील लोकल आणि चर्चगेट ते वांद्रेदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल धावणार नाहीत.

 मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

  • कधी- रविवार, ३ फेब्रुवारी, स. १०.३० ते दु. ३.००
  • कुठे- माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग
  • परिणाम- ब्लॉकमुळे माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावरील लोकल गाडय़ा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ठाणे स्थानकानंतर या लोकल पुन्हा डाऊन जलद मार्गावर धावतील. ठाणे स्थानकानंतर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबतील. सर्व मार्गावरील लोकल फेऱ्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्ग

  • कधी- रविवार, ३ फेब्रुवारी, स. ११.३० ते दु. ४.०० वा.
  • कुठे- मानखुर्द ते नेरुळ दोन्ही मार्गावर.
  • परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.