मुंबईतील अतिवृष्टीत बेपत्ता झालेले डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा येथील किनाऱ्यावर सापडला असून पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यकृताच्या आजारांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले बॉम्बे रुग्णालयातील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीत बेपत्ता झाले होते. डॉ. अमरापूरकर यांच्या चालकाने मंगळवारी दुपारी साडे चारच्या सुमारास कार एल्फिन्स्टन रोड परिसरात उभी केली होती. डॉ. अमरापूरकर तिथून चालत प्रभादेवीतील निवासस्थानाच्या दिशेने निघाले होते. मात्र, ते घरी पोहोचलेच नव्हते. अमरापूरकर हे मेनहोलमध्ये पडल्याचे काही नागरिकांचे म्हणणे होते. अखेर गुरुवारी सकाळी डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा येथील किनाऱ्यावर सापडला.

देशातील प्रमुख पोटविकारतज्ज्ञांपैकी एक म्हणून डॉ. अमरापूरकर यांचे नाव घेतले जायचे. गेल्या २० वर्षांपासून ते बॉम्बे रुग्णालयात पोटविकारतज्ज्ञ म्हणून काम करत होते. डॉ. अमरापूरकर हे मूळचे सोलापूरचे असून त्यांचे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण येथून झाले होते. सोलापूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईत आले. मुंबईतील नायर रुग्णालयातून त्यांनी यकृताच्या आजाराबाबतचे विशेष शिक्षण घेतले होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत असून दोन्ही मुले अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट शाखेतील ते पहिले तज्ज्ञ होते.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीतील बळींचा आकडा आता १६ वर पोहोचला आहे. ठाण्यात चार आणि पालघर जिल्ह्यात चार जणांचा पावसामुळे मृत्यू झाला होता. याशिवाय मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये व्यक्ती हरवल्याच्या काही तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.