चोवीस तासांपेक्षा जास्त काळ ठप्प असलेली विरार ते भाईंदर लोकल सेवा बुधवारी दुपारनंतर संथगतीने सुरु झाली. पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी देखील पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करतच कार्यालय गाठावे लागणार आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसरात पावसाच्या रुद्रावतारामुळे मंगळवारी सकाळी मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असून मध्य व हार्बर रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर विरार ते भाईंदर या मार्गावरील वाहतूक २४ तासानंतर संथगतीने सुरु झाली.  या मार्गावर सध्या १० किमी प्रति तास या वेगाने लोकल गाड्या चालवल्या जात आहे.

नालासोपारामधील रेल्वे रुळांवरील पाणी ओसरत असून पाणी ओसरल्यानंतरच रेल्वे सेवा सुरळीत होईल, असे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले. सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी एक लोकल ट्रेन विरारहून चर्चगेटच्या दिशेने रवाना झाल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले. पावसामुळे पश्चिम रेल्वेवरुन धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मध्य रेल्वेवर आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इंद्रायणी आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.