मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असतानाच वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळील रस्ता खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत देखील कोसळली असून या घटनेत सुमारे १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी रस्त्याच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अँटॉप हिल परिसरात  असलेल्या लॉईड्स ईस्टेटच्या कम्पाऊंड जवळ असलेला मोठा भाग सोमवारी सकाळी कोसळला. त्यात जवळपास १५ कार दबल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या बांधकामाविषयी स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ‘दोस्ती एकर्स’ ला बीएमसी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे.

वडाळ्यातील या घटनेप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खोदकाम करताना दोस्ती बिल्डरने व्हायब्रेटरच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.