काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना ओला-उबरची धास्ती; रिक्षाचालक मात्र भाडेवाढीवर ठाम

ओला-उबरसारख्या अ‍ॅपआधारित टॅक्सी कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि त्यातच भाडेवाढ झाल्यास प्रवासीसंख्या कमी होण्याची भीती यामुळे टॅक्सीचालकांना यंदा भाडेवाढच नको आहे. रिक्षा-टॅक्सी भाडेनिश्चितीचे सूत्र ठरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या खटुआ समितीसमोरच टॅक्सीचालकांच्या संघटनेने ही भूमिका घेतली आहे. परिणामी यंदा तरी किमान टॅक्सीच्या भाडय़ात वाढ होणार नाही, असे संकेत मिळत आहेत. टॅक्सी संघटनांनी हा पवित्रा घेतलेला असतानाच रिक्षा संघटनांनी मात्र भाडेवाढीसाठी जोर लावला आहे.

रिक्षा व टॅक्सीचे भाडेनिश्चितीचे सूत्र निश्चित करण्यासाठी एक वर्षांपूर्वी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून येत्या आठवडय़ात अहवाल सादर केला जाईल. टॅक्सी संघटनांच्या या भूमिकेचे पडसाद सादर होणाऱ्या बी. सी. खटुआ यांच्या अहवालातही उमटण्याची शक्यता आहे.

खटुआ समिती अस्तित्वात येण्याआधी एकसदस्यीय हकीम समितीने आखून दिलेल्या सूत्रानुसारच भाडेवाढ होत होती. मात्र त्यावर प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर या समितीऐवजी खटुआ समिती स्थापन करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी काळ्या-पिवळ्या रिक्षा व टॅक्सी चालकांना हकीम समितीनुसार भाडेवाढ मिळाली. ऑगस्ट २०१४ रोजी रिक्षाचे किमान भाडे १५ रुपयांवरून १७ रुपये झाले होते, तर टॅक्सीचे भाडे १९ रुपयांवरून २१ रुपये झाले. त्यानंतर १ जून २०१५ पासून पुन्हा नवीन भाडे लागू करण्यात आले. यात रिक्षा व टॅक्सीच्या भाडय़ात किमान एक रुपया वाढ झाली. रिक्षाचे भाडे १७ वरून १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयावरून २२ रुपये झाले. सलग झालेल्या वाढीमुळे प्रवासी संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला, मात्र तेव्हापासून आजतागायत भाडेवाढ झालेली नाही. वर्षभरापूर्वी बी. सी. खटुआ यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. ही समिती या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आपला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे आता रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

‘अर्थात अ‍ॅपआधारित टॅक्सी कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि त्या देत असलेल्या चांगल्या सेवेमुळे काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी खासगी टॅक्सींची धास्ती घेतली आहे. याच कारणामुळे टॅक्सी संघटना व चालकांना भाडेवाढ नको आहे,’ असे बी. सी. खटुआ यांनी सांगितले. काही चालक प्रवाशांप्रति आपल्या वागणुकीत बदल होण्याची गरज व्यक्त करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. टॅक्सीचालकांना भाडेवाढ नको असली तरी रिक्षाचालक संघटना भाडेवाढीवर ठाम आहेत, अशी पुस्तीही खटुआ यांनी जोडली.

भाडेवाढ नको असल्याचे स्पष्टपणे आम्ही खटुआ समितीला सांगितलेले आहे. खासगी टॅक्सी कंपन्यांनी स्पर्धा निर्माण केली असून भाडे वाढवले तर आमचे प्रवासी नाराज होतील.

– ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

टॅक्सीचालकांना सध्या तरी भाडेवाढ नको आहे. आमच्या संघटनेचीही हीच भूमिका आहे. भाडे वाढवून टॅक्सीचालकांचे उत्पन्न कमी होईल अशी भीती आहे.

– के. के. तिवारी, मुंबई अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी संघटना

रिक्षाचालकांना भाडे वाढवून हवे आहे. काही टॅक्सी संघटनेची भाडे न वाढवण्याची जरी मागणी असली तरी आम्हाला भाडे वाढवून पाहिजे हीच भूमिका आम्ही घेतली आहे. दोन वर्षांत भाडे वाढलेले नाही आणि सध्या वाहन खर्चासह अन्य खर्चही वाढले असून ते पाहता रिक्षाचालकांना भाडे वाढवून देणे हाच पर्याय परिवहन विभागासमोर आहे.

– शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन