24 January 2021

News Flash

२६/११ मुंबई हल्ला : दहशतवादी हल्ला सुरु असतानाही रतन टाटांना करायचा होता ‘ताज’मध्ये प्रवेश, पण…

टाटा म्हणाले, "मी ताजच्या एक्सचेंजमध्ये फोन केला. पण..."

मुंबईवर २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी ३१ जणांचे प्राण घेतले. जवळजवळ ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यामध्ये ताज हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. या दहशतवादी हल्ल्यामध्ये गेट वे ऑफ इंडिया जवळ असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते. मात्र हॉटेलमध्ये गोळीबार होत असल्याने रतन टाटा यांना सुरक्षारक्षकांनी आतमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेसंदर्भातील खुलासा स्वत: रतन टाटा यांनी केला आहे. नॅशनल जिओग्राफीच्या मेगा आयकॉन्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी अनेक गोष्टींबद्दल पहिल्यांदाच खुसाला केला असून त्यामध्ये मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा ताजमध्ये गेल्यानंतरचा अनुभवही सांगितला आहे.

त्या दिवशी काय घडलं?

२००८ च्या हल्ल्याबद्दल बोलताना रतन टाटा यांनी आपण ताजमध्ये हल्ला झाल्याचे समजताच तिथे जाण्यासाठी निघालो असं सांगितलं.  “कोणीतरी मला २६ नोव्हेंबर २००८ रोजी फोन करुन ताजमध्ये गोळीबार होत असल्याची माहिती दिली. मी ताजच्या एक्सचेंजमध्ये फोन केला. पण तो कोणी उचलला नाही. हे अगदीच विचित्र होतं. मग मी स्वत: गाडी घेऊन तिथे गेलो. मात्र सुरक्षारक्षकाने मला हॉटेलच्या लॉबीमध्ये जाऊ दिलं नाही कारण तिथे गोळीबार होत होता,” असं रतन टाटा म्हणाले. त्यानंतर रतन टाटांनी टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आर. के. कृष्णकुमार यांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली. “ताजमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. तिथे गोळीबार होत आहे असं मला रतन टाटांनी फोन करुन सांगितलं,” असं त्या दिवशाची आठवण सांगताना कृष्णकुमार म्हणाले.

तीन दिवस तीन रात्र फुटपाथवरच…

“हल्ला झाला त्यावेळी हॉटेलमध्ये ३०० पाहुणे होते. अनेक ठिकाणांवरुन हॉटेलमधील ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आलं. यामध्ये हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले. आत्पकालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची काही योजना नसतानाही त्यांनी अनेकांना सुखरुपणे बाहेर काढलं. मात्र हे सारं करताना त्यापैकी काहीजणांना आपला प्राण गमावावे लागले,” असंही रतन टाटा यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. या संकट प्रसंगामध्ये रतन टाटा हे ताजच्या व्यवस्थापनाबरोबर आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे होते. हल्ला झाल्यापासून पुढील तीन दिवस तीन रात्री त्यांनी हॉटेलच्या बाहेरील फुटपाथवरच काढल्या असं कृष्णकुमार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> रतन टाटांची एकूण संपत्ती आहे तरी किती?

हल्ल्यानंतर पहिल्यांदा ताजमध्ये टाटांनी पाऊल ठेवलं तेव्हा काय दिसलं?

दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्यानंतर रतन टाटा जेव्हा पहिल्यांदा ताजमध्ये गेले तेव्हा त्यांनी काय पाहिलं यासंदर्भातील त्यांनी मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे. “जे घडलं त्यानंतर मी आणि कृष्णकुमार यांना मुख्य प्रवेशद्वारामधून वसाबी रेस्तराँमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्याच ठिकाणी शेवटचा गोळीबार झाला होता. तिथे भिंतीवर गोळ्यांचे निशाण होते, काचा तुटल्या होत्या, सर्व वॉलपेपर वगैरे जळालेल्या स्थितीत होतं. आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यावेळी लाईट्सही नव्हते. ती परिस्थिती पाहून थोडी भीती वाटत होती. असं होऊ नये की पुढील क्षणी कुठून तरी गोळीबार केला जाईल. गोळीबार खरंच थांबला आहे का अशी शंकाही मनात आली. हल्ला थांबला आहे यावर विश्वास बसण्यासाठी थोडा वेळ लागला. मेंदू हल्ला थांबल्याचं सांगत होता मात्र परिस्थिती त्यावर विश्वास ठेवण्याची परवानगी मेंदूला देत नव्हती अशी काहीतरी संभ्रामवस्था त्यावेळी निर्माण झालेली,” असं रतन टाटा त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणाले.

स्वत: रुग्णालयात जाऊन जखमींना भेटले अन्…

ताजवरील दहशतवादी हल्ल्यानंतर रतन टाटा आणि कृष्णकुमार हे दोघे अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन ताज येथील हल्ल्यात जखमी झालेल्या प्रत्येक रुग्णाला स्वत: भेटले. “ते आणि मी त्यानंतर अनेक रुग्णालयांमध्ये गेलो आणि अनेकांना भेटलो. त्यावेळी आमचे अनेक कर्मचारी मृत्यूमुखी पडल्याचे आम्हाला समजले. तेव्हा यांच्यासाठी काहीतरी करायला हवं असं आम्हाला वाटलं. मात्र आम्ही केवळ ताजमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबरोबरच इतर ठिकाणी या हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी काहीतरी करावं असा विचार केला. या लोकांना मदत करण्यासाठी पब्लिक वेलफेअर ट्रस्ट सुरु करावा असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्याची सुरुवात ताजपासून केलं,” असं कृष्णकुमार म्हणाले.

शिक्षणाची जबाबदारी आणि सर्व पगार दिला

ताजमधील कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धीतीने या संकटाचा सामना केला त्याचा अपल्याला अभिमान असल्याचे टाटा सांगतात. “अनेक गोष्टींबद्दल मला ताज आणि तेथील कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी जे केलं ते अभिमानास्पद आहे. आम्ही सर्वांनी एक एक वीट एकत्र करुन ताज पुन्हा उभं केलं. मरण पावलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतली. मरण पावलेल्या व्यक्तींच्या निवृत्तीच्या वयापर्यंतचा पगार त्यांच्या कुटुबियांना आम्ही दिला. हे सगळं आम्हाला करता आलं त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असंही रतन टाटा या मुलाखतीमध्ये म्हणाले.

१९९२- १९९३ च्या हिंसेनंतर रतन टाटांनी छापलेली जाहिरात

२००८ च्या दहशतवादी हल्ल्यांपूर्वी १९९२ आणि १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या हिंसक घटनानंतर रतन टाटांनी अर्ध्या पानावर जाहिरात देत आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि मुंबईला हिंसेमध्ये जळू देता काम नये असं म्हटलं होतं. श्रीकृष्णा कमिशनसमोर त्यावेळी रतन टाटा यांनी हजेरी लावली होती. टाटा यांनी त्यावेळी जे अनुभवलं त्याची दाहकता त्यांनी कमिशनच्या सभासदांसमोर मांडली, असं रतन टाटा यांची बहीण श्रीनी जिजीबॉय यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 9:28 am

Web Title: mumbai terror attacks 26 11 ratan tata talks about taj hotel scsg 91
Next Stories
1 मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात
2 रेल्वे प्रवाशांना मनस्ताप
3 प्रवेशासाठीच्या बंधनांमुळे मालवाहतूकदार संभ्रमात
Just Now!
X