भाऊचा धक्का ते रो-रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी सेवेसारखीच जलवाहतूक किनारपट्टीवरील अन्य ठिकाणी सुरु करता येईल का? यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा सुरु कऱण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली त्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. या सेवेमुळे पर्यावरणस्नेही जल वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

या संदर्भातला एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. ही सेवा नेमकी कशी असेल हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. रो-रो सेवेसाठी ग्रीस येथून आणलेल्या जहाजाची चाचणी यशस्वी ठरली आहे. एकाचवेळी एक हजार प्रवासी आणि २०० कार वाहून नेण्याची क्षमता जहाजाची आहे. साधारण तिकिट २२० रुपये, एसीचे तिकीट ३३० रुपये तर लक्झरी क्लासचे तिकीट ५५० रुपये आहे. कारच्या आकारानुसार ११०० ते १९०० रुपये तिकीट आकारण्यात येईल.

केंद्र सरकार अंतर्गत मुंबई महानगराला जलवाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मुंबईतील भाऊचा धक्का आणि अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल आणि जेट्टी उभारण्यात आली होती. ही सेवा जून २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जलवाहतुकीसाठी बोट उपलब्ध न झाल्याने सेवा रखडली. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘प्रोटोपोरस’ नामक बोट गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाली. आता सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून अलिबागला वाहने घेऊन येणे सहज शक्य होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे टाळणे शक्य होणार आहे.