News Flash

मुंबईकर खोकल्याने त्रस्त

तापमानातील चढउतारामुळे ऋतू बदलताना होणारा सर्दी-खोकला मुंबईकरांना परिचयाचा आहे.

तापमान कमी झाल्याचा आनंद मुंबईकर साजरे करीत असतानाच दुसरीकडे हवेतील वाढलेल्या प्रदूषणाचा त्रासही वाढला आहे.

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम
तापमानातील चढउतारामुळे ऋतू बदलताना होणारा सर्दी-खोकला मुंबईकरांना परिचयाचा आहे. मात्र सध्या कोरडय़ा खोकल्याची साथ पसरत असून, तिला विषाणूंपेक्षाही प्रदूषण जबाबदार असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तापमान कमी झाल्याने हवेतील प्रदूषित घटक वातावरणाच्या खालच्या थरातच अडकून राहत आहेत. हे धूलिकण श्वसनमार्गात गेल्याने होणारा कोरडा खोकला बरा होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागत आहेत.
वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, बांधकामाच्या ठिकाणी उडणारे कण याच्यासोबतीने फुलामधील परागकण मुंबईच्या हवेत वर्षभर असतात. मात्र दिवसा तापमान वाढल्यानंतर हवेचा जमिनीलगतचा थर वर जातो आणि त्यासोबत प्रदूषित घटकांचे प्रमाणही कमी होते. थंडीच्या दिवसात मात्र जमिनीलगतची हवा तिथेच अडकते व हवेतील धूर, धूलिकण श्वसनावाटे शरीरात जातात. त्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला असे त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऋतू बदलताना विषाणूंमुळे येणारा खोकला व थंडीतील खोकला यात फरक आहे. थंडीतील खोकला हा श्वसनमार्गिका कोरडा झाल्यामुळे होतो. त्यातच प्रदूषणामुळे या खोकल्याची तीव्रता वाढते. विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य खोकल्यात तापही येतो तसेच कफ होतो. हा खोकला तीन-चार दिवसांत बरा होतो. मात्र धूळ, परागकण यामुळे होत असलेल्या खोकल्यात क्वचित एखाद् दिवस बारीक ताप येतो. त्यानंतर कोरडा खोकला पंधरा ते वीस दिवस राहतो, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.
मुंबईच्या हवेत सध्या दहा मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या धूलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शरीराच्या संरचनेमुळे १० मायक्रोमीटरपेक्षा आकाराने मोठे असलेले धूलिकण शरीरात प्रवेश करू शकत नाही. मात्र २.५ ते ५ मायक्रोमीटपर्यंतचे कण नाक, कान, घसा, स्वरयंत्र यांना अपाय करतात. खोकला, सर्दी, शिंका यासोबतच डोळ्यांची आगही होते. २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे धूलिकण थेट फुप्फुसात प्रवेश करून तेथे जमा होण्याचीही शक्यता असते. यामुळे दमा, ब्रोन्कायटिसपासून कर्करोगही होतो. या सर्वाचा विचार करता मुंबईच्या हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी तातडीने उपायायोजना करण्याची गरज असल्याचे पत्र श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक महाशूर यांनी नगरविकास विभागाला लिहिले आहे.

अंधेरी, चेंबूर प्रदूषितच
तापमान कमी झाल्याचा आनंद मुंबईकर साजरे करीत असतानाच दुसरीकडे हवेतील वाढलेल्या प्रदूषणाचा त्रासही वाढला आहे. अंधेरी, मालाड व चेंबूर या उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी २.५ मायक्रोमीटर व्यासापेक्षा (केसाच्या टोकाचा व्यास ७० मायक्रोमीटर असतो.) कमी आकाराचे धूलिकण प्रमाणित पातळीपेक्षा तिपटीहून अधिक होते. १० मायक्रोमीटपर्यंत आकाराच्या धूलिकणांची संख्याही अधिक होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:00 am

Web Title: mumbai troubled by cough
Next Stories
1 अंधेरीत आगीत वृद्धेचा मृत्यू
2 ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमा’तील तरतुदी पुढारलेल्या!
3 महिलांच्या स्वच्छतागृहासाठी सर्वसमावेशक योजना आखावी
Just Now!
X