गोंधळ सावरण्याचा प्रयत्न; लाखो विद्यार्थ्यांचे निकाल रखडले

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल वेळेवर लावण्यासाठी ऑनस्क्रीन मूल्यांकनाचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविला. त्यांनी पदभार स्वीकारून आज दहा दिवस पूर्ण होते आहे. या दहा दिवसांमध्ये कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३५ अभ्यासक्रमांचाच निकाल लावणे शक्य झाले आहे. यामुळे विद्यापीठातील सध्याच्या प्रभारी पदस्थांच्या कामालाही अद्याप गती मिळालेली नाही. परिणामी लाखो विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. डॉ. शिंदे यांच्या दहा दिवसांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज राज भवनात बैठक बोलविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई विद्यापीठाचे यांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे निकाल रखडले आहेत. असा ठपका ठेवत त्यांना लवकरात लवकर निकाल लावण्याचे आव्हान स्वीकारलेल्या शिंदे यांना मदतीसाठी प्रभारी प्र-कुलगुरू धीरेन पटेल यांचीही नियुक्ती करण्यात आली. या दोघांनीही अल्पावधीतच विद्यापीठातील कर्मचारी, प्राध्यापक वर्ग यांच्याशी चर्चा करून या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र प्रकियेतील तांत्रिक घोळ इतका क्लिष्ट आहे की तो समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्यातच बराच वेळ खर्च होत असल्याने प्रक्रिया रखडत आहे. विद्यापीठाचे सर्व निकाल कधी लागतील याबाबत अद्याप सध्याच्या सर्वच ‘प्रभारी’ पदस्थांकडे उत्तर नाही. यामुळे विद्यार्थ्यांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार याबाबत अनिश्चितता आहे .

गुरुवारी १५ निकाल

गेल्या आठवडाभरापासून निकाल जाहीर करण्याचा थंडावलेल्या कारभारानंतर आता मात्र निकालांची गती वाढली आहे. गेला आठवडाभर फक्त दिवसाला एक ते तीन निकाल जाहीर होत होते. मात्र गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत ११ निकाल जाहीर झाले असून रात्री उशिरापर्यंत काम सुरू राहणार असल्यामुळे १५ निकाल जाहीर होतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारून आठ दिवस झाले आहेत. या आठ दिवसांमध्ये  तांत्रिक आणि प्रक्रियेतील चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. ज्या चुकांवर तांत्रिक उत्तर नाही त्यावर जुन्या पद्धतीचा वापर करून तोडगा काढण्यात आला आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र सर्व निकाल कधीपर्यंत लागतील हे सांगणे मात्र कठीण आहे.  डॉ. धीरेन पटेल, प्रभारी प्र- कुलगुरू