04 June 2020

News Flash

मतदारयाद्यांतील गोंधळाने संताप..

मतदानासाठी नवमतदारांचा उत्साह गुरुवारी ओसंडून वाहात असतानाच मतदार यादीत नाव नसण्याबरोबरच यादीत झालेल्या नावांच्या चुका, अनेकांची नावे गायब होणे, यादीत नाव एकाचे

| April 25, 2014 03:57 am

मतदानासाठी नवमतदारांचा उत्साह गुरुवारी ओसंडून वाहात असतानाच मतदार यादीत नाव नसण्याबरोबरच यादीत झालेल्या नावांच्या चुका, अनेकांची नावे गायब होणे, यादीत नाव एकाचे, छायाचित्र दुसऱ्याचे आणि पत्ता तिसराच, एकाच घरातील सदस्यांची वेगवेगळ्या केंद्रांवर आलेली नावे, प्रभागांचे बदललेले क्रमांक आणि त्याबाबत न झालेली जनजागृती अशा अनेक गोंधळांमुळे हजारो मुंबईकरांचा संतापही अनावर झाला होता. आजवर प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविणाऱ्या नागरिकांना मतदान न करताच घरी परतावे लागले.
मतदार यादीत नाव आहे की नाही, याची छाननी करण्याची संधी नागरिकांना दिली होती आणि त्यासाठी खास मोहीमही राबविली होती, असा निवडणूक आयोगाचा दावा असला तरी ती मोहीम नियोजनबद्ध नव्हती, असा नागरिकांचाही आरोप आहे. मतदारांकडे आयोगानेच जारी केलेले ओळखपत्र असले तरी आयोगाकडे त्यांचे छायाचित्र नाही, यात मतदारांची चूक आहे की आयोगाची, असा सवालही नागरिक करीत असून ही छायाचित्रे गहाळ होण्यावरून निवडणूक आयोगातील दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.
वरळी, कुलाबा, मुलुंड इथे अनेक मतदारांची नावेच गायब असल्याने मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी आणि मतदारांमध्ये वादंग होत होते. या घोळामुळे मुलुंड पूर्वमध्ये मतदारांच्या संतापाचा उद्रेक झाला. सुमारे दोनशे मतदारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली. मात्र पोलिसांनी या जमावास बाहेरच रोखले. भाजपाचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. यातील बहुतांश मतदार गुजराती समाजाचे होते. त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ हा गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा असल्याची तक्रार आपण उद्याच दाखल करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
सहा गुन्हे दाखल
गुरुवारी मतदानाच्या दिवशी मुंबईत सहा गुन्हे दाखल झाले. त्यात पोलीस हवालदाराच्या हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि बोगस मतदान आदींचा समावेश आहे. ट्रॉम्बे येथे शिवसेना आणि मनसे यांच्यात पैसे वाटण्याच्या आरोपावरून झालेल्या मारामारीत एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला. तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुलुंड आणि मेघवाडी येथे दोन गुन्हे दाखल झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2014 3:57 am

Web Title: mumbai voters angry as name missing from electoral roll
Next Stories
1 आजपासून राज्यात तीन दिवसांचे भारनियमन
2 ठाण्यात मतदान केंद्रावरील महिला अधिकाऱ्याचा मृत्यू
3 आयोगाचे ‘इंजिन’ बिघडले..
Just Now!
X