मुंबई

‘स्वरमयी’ या संस्थेतर्फे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या सन्मानार्थ दोन दिवसांच्या ‘सहस्रचंद्र स्वर-नाटय़ प्रभा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात डॉ. प्रभा अत्रे यांनी लिहिलेल्या अकरा पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादाचे तसेच काही पुस्तकांच्या सुधारित आवृत्त्यांचे प्रकाशन होणार आहे. तसेच डॉ. अत्रे यांनी संगीतबद्ध केलेल्या काही बंदिशींचे सादरीकरण मान्यवर गायक करणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार करण्यात येणार असून या सोहळ्यास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या या महोत्सवास रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. पं. अजय पोहनकर, व्यंकटेश कुमार, धनश्री पंडित-राय, साधना सरगम, आनंद भाटय़े, झेलम परांजपे हे मान्यवर डॉ. प्रभा अत्रे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना सादर करणार आहेत.

  • कधी :शनिवार ४ आणि रविवार ५ जून २०१६
  • कुठे : रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
  • केव्हा : सायंकाळी ६ वाजता आणि सकाळी ९.

 

मुक्काम पोस्ट कविता!

मराठी साहित्यात कविता प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीर्घकाव्य किंवा चारोळी प्रकारातून आपल्या मनातील भाव व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम म्हणून कवितेकडे पाहिले जाते. मराठी साहित्यातील या काव्य प्रकाराला अनेक दिग्गज तसेच नवोदित कवींनी समृद्ध केले आहे. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांनी विविध ठिकाणी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम करून कविता रसिकांपर्यंत पोहोचविल्या आणि काव्यवाचन लोकप्रिय केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही मान्यवर आणि नवोदित कवींच्या काव्यवाचनाचे स्वतंत्र कार्यक्रम ठेवले जातात आणि रसिकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. काव्यवाचनाची ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी ‘अष्टगंध’ संस्थेतर्फे ‘मुक्काम पोस्ट कविता’ या कार्यक्रमाचे अर्थात काव्यवाचनाचे आयोजन करण्यात येते. चांगल्या कविता रसिकांपर्यंत पोहोचाव्यात जुन्या व नव्या पिढीतील कवींमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून त्याचा तिसरा प्रयोग मुंबईत होणार आहे. दोन सत्रांत होणाऱ्या या कार्यक्रमात एकूण १७ कवी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

  • कधी : रविवार ५ जून २०१६
  • कुठे: पु. ल. देशपांडे कला अकादमीचे मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम)
  • केव्हा : दुपारी ३ वाजता

 

पाऊस असा रुणझुणता

अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याने हैराण झालेले सगळे जण आता पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत आहेत. पाऊस मुंबईत येईल तेव्हा येईल, पण पावसाच्या संगीतमय मैफलीत चिंब भिजण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. नेहरू सेंटरतर्फे ‘पाऊस असा रुणझुणता’ या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या मैफलीत कविता, गाणी आणि साहित्यातून हा पाऊस उलगडणार आहे. अभिनेता सुनील बर्वे, तुषार दळवी, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, निवेदिका उत्तरा मोने आदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

  • कधी : शुक्रवार, ३ जून २०१६
  • कुठे : हॉल ऑफ कल्चर, नेहरू सेंटर, वरळी
  • केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता

 

राजेश खन्ना याची ‘अनमोल यादे’

अभिनेता राजेश खन्ना याने एक काळ गाजविला. महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि तरुणींचा तो लाडका होता. बॉलीवूडवर ‘सुपरस्टार’ म्हणून त्याने अनेक वर्षे राज्य केले. संवादफेक करण्याची त्याची विशिष्ट अशी खास लकब होती. राजेश खन्नाचा रुपेरी पडद्यावरील गाण्याचा ‘आवाज’ म्हणून किशोरकुमार याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अनेक हिट आणि श्रोत्यांच्या आजही ओठावर असणारी अनेक गाणी किशोरकुमारने राजेश खन्नासाठी गायली. राजेश खन्नाच्या गाण्यांचा आनंद ‘अनमोल यादे’ कार्यक्रमातून श्रोते आणि राजेश खन्नाच्या चाहत्यांना घेता येणार आहे. आरती आणि सिद्धी आर्ट्स प्रस्तुत ‘अनमोल यादे’ कार्यक्रमाचा ३१० वा प्रयोग रंगणार आहे. राजेश खन्नाच्या गाजलेल्या आणि लोकप्रिय गाण्यांचा आनंद पुन्हा एकदा रसिकांना घेता येणार आहे.

  • कधी : शनिवार, ४ जून २०१६

* कुठे : प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली

  • केव्हा : रात्री ८.३० वाजता

 

संजीवनी-आशा

‘काटा लगा’, एक कटी पतंग है’, ‘चुन्हरी संभाल गोरी’ अशी गाणी आजही लोकप्रिय आहेत. ही गाणी ज्या अभिनेत्रीवर चित्रित झाली तिच्या खास उपस्थितीत त्या अभिनेत्रीची अन्य गाणी ऐकण्याची दुर्मीळ संधी त्या अभिनेत्रीच्या चाहत्यांना आणि रसिकांना मिळणार आहे. ती अभिनेत्री आहे आशा पारेख. महेश माने व मीरा अ‍ॅण्ड मी यांनी आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द आशा पारेख उपस्थित राहणार असून पाश्र्वगायिका संजीवनी भेलांडे आशा पारेख यांची गाजलेली गाणी सादर करणार आहेत. चिराग पांचाळ हे सहगायक त्यांना काही गाण्यांमध्ये साथ देणार आहेत.

  • कधी : शुक्रवार, ३ जून २०१६
  • कुठे : नेहरू सेंटर, वरळी
  • केव्हा: रात्री ७.३० वाजता

 

शैलेश व सुदीप कांबळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन

मानवी जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहे. शैलेश आणि सुदीप कांबळे यांनी तैलरंग, अ‍ॅक्रॅलिक व ड्राय पेस्टल वापरून कॅनव्हास आणि आर्ट पेपरवर ही सर्व चित्रे रेखाटली आहेत. निसर्गातील विविध फुले, स्त्रीच्या मनाची मानसिकता व तिच्या भावभावना या २५ चित्रांमधून पाहायला मिळतात.

  • कधी : शुक्रवार ३ ते ५ जून २०१६
  • कुठे : आर्टवॉक गॅलरी, ट्रायडंट हॉटेल, नरिमन पॉइंट
  • केव्हा : सकाळी ९ ते रात्री ९

 

‘वीकेंड विरंगुळा’ या सदरासाठी शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत मुंबईत होणाऱ्या साहित्य, सांस्कृतिक, संगीतविषयक कार्यक्रमांची माहिती shekhar.joshi@expressindia.com या ई-मेल आयडीवर किंवा ०२२-२२८२२१८७ या फॅक्स क्रमांकावर बुधवापर्यंत पाठवावी.