प्रवाशांनी दोनदा नाकारूनही रेल्वेचा नव्याने घाट; प्रयोगावर रेल्वे संघटनांची टीका
गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून पडून होणारे अपघात आणि वाढत्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी येत्या मंगळवारी, २२ डिसेंबरला मध्य रेल्वेने दोन आसनी रांगांची एक लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन आसनी लोकलचा प्रयोग यापूर्वी दोनदा प्रवाशांनी नाकारण्याचा पूर्वानुभव गाठीशी असताना केवळ लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे रेल्वे अधिकारी जुनाच प्रयोग नव्याने करत असल्याची टीका रेल्वे संघटनांकडून केली जात आहे.
डोंबिवलीच्या भावेश नकाते या तरुणाचा लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूनंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंपासून स्थानिक लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वानीच प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. कार्यालयात जाण्याच्या वेळा बदल करण्यापासून स्वयंचलित दारांचा पर्याय चाचपडून पाहिला गेला. हे कौतुकास्पद असले तरी तीन आसनांऐवजी दोन आसनी रांगांची लोकल चालवण्याचा तोडगा रेल्वेने शोधून काढल्याचा भास निर्माण केला जात असल्याचा आरोप यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केला.
दोन आसनी लोकलचा प्रयोग १९७५ साली पहिल्यांदा तर २००६ साली दुसऱ्यांदा केला होता. त्यावेळीही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याने हा प्रयोग दोन्हीं वेळा अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. मात्र पूर्वानुभव असतानाही रेल्वे प्रशासन केवळ खासदारांच्या हट्टापोटी हा जुनाच प्रयोग नव्याने करत असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला.

गर्दीच्या वेळी प्रवासी लोकलच्या दारावर उभे असतात. दोन आसनी लोकल चालवल्यास दारात उभे राहणाऱ्या काही प्रवाशांना डब्यात सुरक्षित उभे राहता येईल. २२ डिसेंबरला एक लोकल प्रायोगिक तत्त्वावर चालवणार आहोत. प्रयोग यशस्वी झाल्यास पुढचा निर्णय घेण्यात येईल.
– नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे