मुंबई आणि महानगर प्रदेशातील मृत्यूदर, तसेच संसर्गाचा प्रसार चिंताजनक आहे. मुंबई शहरातील करोना रुग्णवाढीचा वेग स्थिरावला असला तरी, उपनगर आणि महानगर प्रदेशातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे मत राज्य विशेष कृती दलातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मुंबईत १५ ते ३१ मे या काळात करोना उद्रेकाची लाट येऊन गेली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. सध्या रुग्ण दुपटीचा वेग ३५ दिवसापर्यंत मंदावला आहे. तर करोनामुक्त आणि करोनाबाधित यांमधील तफावत कमी झाली आहे. संसर्गाची तीव्रता आधीच्या तुलनेत कमी झाल्याने मुंबईबाबतची सर्व गणित प्रारुपे खोटी ठरली आहेत, असे या दलातील सदस्य आणि मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

आपल्याकडे लक्षणे असलेल्या आणि रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या केल्या जातात. त्यातही आरटीपीसीआर चाचणीची अचूकता ७० टक्के आहे. म्हणजे ३० टक्के रुग्णांचे नेमके निदान होत नाही. त्यामुळे दररोज निदान होणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडय़ांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. मृत्यूदराबाबत मात्र त्यांनी चिंता व्यक्त केली. येत्या काळात तो एक टक्यावर येणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मृत्यूदराच्या विश्लेषणासाठी नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी मात्र दरदिवशी होणाऱ्या मृत्यूमध्ये घट झाल्याचे सांगितले. अर्थात, धारावी, वरळी हे विभाग नियंत्रणात आले तरी अन्य विभागात संसर्ग पसरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

रुग्णसंख्या जोपर्यत कमी होत नाही तोपर्यत संसर्गाची तीव्रता कमी झाली असे म्हणता येणार नाही, असे संसर्गतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.

पुरेशा खाटा उपलब्ध :

मे महिन्यात रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यातील अडचणी विविध कारणांमुळे दूर झाल्या आहेत. तसेच पालिकेच्या प्रमुख रुग्णालयावरील रुग्णांचा ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले. डॉ. जोशी यांनीही आता करोनावर मात करायला पुरेशी औषधे, खाटा आदी सुविधा उपलब्ध असल्याने सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर काटेकोरपणे पाळून टाळेबंदी टप्प्याटप्प्याने खुली करायला हवी, असल्याचे स्पष्ट केले.

रुग्णवाढीचा वेग..

मुंबईत दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १५ मेपासून ९००च्या वर जायला सुरुवात झाली. मेच्या शेवटच्या आठवडय़ात ती हजारावर, तर जूनच्या पहिल्या आठवडयापर्यत १५०० पर्यत गेली. जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून मात्र यात घट होऊन पुन्हा एक हजारावर आली आहे. गेल्या आठवडाभरात दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १००० ते १२०० या दरम्यान आहे.