मुंबई महापालिका सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यास वृत्तवाहिन्यांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण निवडून दिलेले नगरसेवक विभागातील नागरी प्रश्नांसाठी कशी भूमिका मांडतात हे मतदारांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
लोकसभा  कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी नागरिकांना घरबसल्या मिळते. त्याच धर्तीवर पालिका सभागृहातील कामकाजही पाहण्याची संधी नागरिकांना मिळायला हवी. त्यासाठी सभागृहातील कामकाजाचे छायाचित्रण करण्याची परवानगी वृत्तवाहिन्यांना द्यावी, अशी मागणी मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी विधी समितीच्या बैठकीत केली. यामुळे नागरिकांनाही लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतात हे पाहता येईल, असेही ते म्हणाले. पालिका सभागृहाचेही लवकरच नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर सभागृहातील उपलब्ध जागेत वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी व्यवस्था करण्यात येईल आणि कामकाजाचे चित्रीकरण करण्याची परवानगी त्यांना देण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.