प्रशासन निविदा प्रक्रियेस परवानगी घेण्यातच व्यग्र

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

काही वर्षांपूर्वीच डागडुजी करण्यात आलेल्या प्रभादेवीमधील प्रसूतिगृहाची इमारत मोडकळीस आली असून लोखंडी बांबूंच्या आधारावर ही इमारत उभी आहे. केवळ गरज म्हणून अनेक महिला वैद्यकीय तपासणी आणि प्रसूतीसाठी या रुग्णालयात येत आहेत. या प्रसूतिगृहाला मरणकळा लागलेल्या असताना प्रशासन मात्र निविदा प्रक्रियेस मंजुरी घेण्यातच दंग आहे.

वरळी, परळ, प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या महिलांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी पालिकेने सुमारे ३० वर्षांपूर्वी प्रभादेवी येथील वीर सावरकर मार्गावर हाजी मोहम्मद हाजी साबुसिद्धीक प्रसूतिगृह उभारले. सुमारे ३० ते ३५ खाटांच्या या प्रसूतिगृहात प्रसूतिगृहात कायम गर्दी असते.

काही वर्षांपूर्वी या प्रसूतिगृहाची इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे २०१०च्या सुमारास या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा ही इमारत धोकादायक बनली आहे.

या इमारतीमधील स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. त्याबाबत तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे अखेर प्रसूतिगृहाच्या इमारतीमधील धोकादायक भागात लोखंडी बांबूंचा आधार देण्यात आला. याबाबत स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांनी आरोग्य समितीच्या अध्यक्षांना ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पत्र पाठवून धोकादायक अवस्थेत असलेल्या प्रसूतिगृहाची कल्पना दिली.

आरोग्य समितीच्या बैठकीत हा विषय गाजला. पालिका प्रशासनाने प्रसूतिगृहाच्या इमारतीची संरचनात्मक तपासणी केली असून या इमारतीची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे संरचनात्मक तपासणीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर तातडीने या प्रसूतिगृहाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र अद्यापही ही इमारत लोखंडी बांबूंच्या आधारावरच उभी आहे.

या इमारतीच्या दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून इमारत दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

धोकादायक अवस्थेत असलेल्या या प्रसूतिगृहात असंख्य महिला उपचारासाठी येतात. या इमारतीची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?

– समाधान सरवणकर, स्थानिक नगरसेवक