नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुजीत कुमार याने पोलीस कोठड़ीत कंबरेच्या पट्टा आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. त्यामुळे न्यायालयाने त्याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. दरम्यान जे जे रूग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत काहीच आढळून आले नाही. त्यानंतर न्यायालयाने त्याला व दुसरा आरोपी भारत कुरणे याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी कुमारला अटक केली होती. त्याचा ताबा १२ सप्टेंबरला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आपल्याकडे घेतला आहे.

सुजीत कुमारच्या कोठडीत वाढ मिळावी म्हणून त्याला न्यायालयात आणले होते. त्यादरम्यान सुजीत कुमारने पोलिसांनी आपल्या पट्टा आणि काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याच्या वैद्यकीय तपासणीचा आदेश दिला होता. परंतु, वैद्यकीय चाचणीत काहीच आढळून आले नाही. दरम्यान, नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जळगावमधून ताब्यात घेत अटक केलेला आरोपी लीलाधर उर्फ विजय लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठड़ीमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.