मुंबईतील गिरगावमध्ये राहणाऱ्या नारायण लवाटे (८६) आणि त्यांची पत्नी इरावती (७९) यांच्या इच्छामरणाच्या मागणीबाबत मागच्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. याबाबत या दाम्पत्याने राष्ट्रपतींना पत्रही लिहीले होते. मात्र त्यांच्या या पत्राला एक महिना होऊन गेला तरी उत्तर न आल्याने त्यांनी आपल्या हत्येची एक योजना केली आहे. इरावती यांनी आपल्या पतीला एक पत्र लिहीले आहे. त्यामध्ये त्यांनी पतीला तुम्ही माझा गळा दाबा अशी मागणी केली आहे. असे केल्यामुळे पतीलाही मृत्यूदंडाची शिक्षा होईल आणि त्यांचीही सुटका होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

हे दाम्पत्य गिरगावातील ठाकूरद्वार येथे राहते. लग्नाच्या पहिल्याच वर्षी आम्ही दोघांनीही मूलाला जन्म द्यायचा नाही असा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे आम्हाला कोणीही वारस नाही. अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छा मरणाची मागणी केली आहे असे या दोघांनी म्हटले आहे. नारायण लवाटे हे एस.टी. महामंडळाच्या अकाऊंट विभागात कार्यरत होते. तर इरावती लवाटे या गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आता मृत्यू येणार हे अटळ आहे मात्र त्याची वाट न पाहता तो आम्हाला सोबत यावा अशी इच्छा असल्याने आम्ही २१ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींकडे दोघांनीही व्यक्त केली होती.

३१ मार्चपर्यंत आम्ही राष्ट्रपतींच्या उत्तराची वाट पाहणार, नाहीतर आम्ही आमचा निर्णय घेणार असा निर्वाणीचा इशारा इरावती यांनी दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती त्यांना उत्तर देणार का आणि कधीपर्यंत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. आम्ही केलेली याचिका गंभीररित्या घेतली जात नसल्याबाबत त्यांनी काहीसा संतापही व्यक्त केला. इतर काही देशांमध्ये इच्छामरणाचा अधिकार असताना भारतात तो का मान्य होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.