News Flash

..तेव्हा नारायण राणेंना चव्हाण यांच्याकडूनच मदत

विलासराव आणि अशोकरावांचे बिनसल्यावर अशोकरावांनी राणे यांना साथ दिली.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्टय़ाबोळ केला, असा आरोप करीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी चव्हाण यांना लक्ष्य केले असले तरी २००८ मध्ये राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्यावर यथेच्छ टीका करणाऱ्या राणे यांचे काँग्रेसमधील निलंबन मागे घेणे आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याकरिता अशोक चव्हाण यांनीच पुढाकार घेतला होता. विलासराव देशमुख यांच्याविरोधात राणे आणि अशोकराव एकत्र होते. राणे यांनी आता मात्र अशोकरावांवर सारे खापर फोडले आहे.

विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना राणे यांनी मोहीम राबविली होती. विलासराव आणि अशोकरावांचे बिनसल्यावर अशोकरावांनी राणे यांना साथ दिली. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नेतृत्व बदल करताना काँग्रसने राणे यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली होती. तेव्हा राणे कमालीचे संतप्त झाले होते. मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्यावर टीका केली होती. राणे यांनी अहमद पटेल यांच्यावर तर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यातून काँग्रेसने राणे यांना पक्षातून निलंबित केले होते.

राणे यांच्यासारखा आक्रमक नेता अन्य पक्षांमध्ये जाण्याऐवजी काँग्रेसमध्ये असावा, असा विचार करून राणे यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत शब्द टाकला होता. राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्यावरच टीका केल्याने काँग्रेस नेते राणे यांच्याविरुद्धची कारवाई मागे घेण्यास तयार नव्हते. अशोक चव्हाण यांनी तेव्हा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. २००९च्या निवडणुकीत राणे उपयुक्त ठरतील, असे दिल्लीच्या निदर्शनास आणून दिले होते. शेवटी अशोक चव्हाण यांनी केलेली मध्यस्थी कामाला आली आणि राणे यांचे निलंबन काँग्रेसने मागे घेतले. निलंबन मागे घेण्यात आल्यावर राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तेव्हा राणे यांच्याकडे उद्योग खाते सोपविण्यात आले होते. २००९च्या निवडणुकीनंतर अशोक चव्हाण यांचीच मुख्यमंत्रिपदी फेरनिवड झाल्यावर राणे यांच्याकडे अशोकरावांनी महसूल हे खाते सोपविले होते.

राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्यावर गंभीर स्वरूपांचे आरोप केल्यावरच काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राणे यांच्या नावावर फुली मारली होती. तेव्हा राणे यांचे राजकीय पुनर्वसन होणे कठीण होते. पण अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्षाने एक पाऊल मागे घेतले होते. राणे यांनी त्यांच्या दुसऱ्या बंडात अशोक चव्हाण यांच्यावरच सारे खापर फोडले आहे.

स्वत: राणे व नीलेश आणि नितेश या त्यांच्या दोन पुत्रांनी सोमवारी कुडाळमधील सभेत अशोकरावांना लक्ष्य केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2017 4:43 am

Web Title: narayan rane ashok chavan disputes
Next Stories
1 शिवसेना आणि राणे योगायोग की..?
2 ‘कुपोषणामुळे बालमृत्यू झाल्यास सरकार जबाबदार’
3 आदित्य ठाकरे यांचा पुन्हा स्वप्नभंग!
Just Now!
X