काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काहीही होण्याची शक्यता गृहीत धरून वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच स्वत:ची फौज प्रचारात उतरविली आहे. कोणताही धोका mu06पत्करण्यास राणे तयार नसून, प्रचारात आतापर्यंत तरी त्यांनी वादग्रस्त विधाने करण्याचे टाळले आहे.
काँग्रेसमध्ये नेत्याच्या निवडणुकीत फटाके लावण्याचे प्रयत्न अनेकदा झाल्याची उदाहरणे आहेत. हा धोका ओळखूनच राणे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच आपली समांतर यंत्रणा प्रचारात उतरविली आहे. नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांना विभाग वाटून देण्यात आले आहेत. घरोघरी प्रचारासाठी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. याशिवाय राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जवळच्या कार्यकर्त्यांना विभाग वाटून देण्यात आले आहेत.
राणे यांच्या प्रचारात मुंबई काँग्रेसचे सारे नेते प्रचारात सहभागी झाले आहेत. तरीही काही नेते राणे यांना अपशकुन करण्याची संधी सोडणार नाहीत अशी चिन्हे आहेत. हे सारे लक्षात घेऊनच राणे यांनी प्रचाराची यंत्रणा तयार  केली आहे. काँग्रेसचे नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांना दुखवायचे नाही, पण त्याचबरोबर त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही ही नीती अवलंबिली आहे. राणे यांच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रयत्नशील आहेत. मुस्लीम मतांचे प्रमाण लक्षात घेता स्थानिक मतदारांवर प्रभाव टाकू शकतील अशा नेत्यांनी प्रचारात यावे म्हणून चव्हाण यांनी विनंती केल्याचे सांगण्यात येते.

राणे अद्याप शांत
पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोणतेही वादग्रस्त विधान किंवा संघर्ष होईल असे करू नये, असे काँग्रेस नेत्यांकडून राणे यांना बजाविण्यात आले आहे. शिवसेना उचकविण्याचा प्रयत्न करेल व त्याला प्रत्युत्तर देताना वाद निर्माण होऊ शकतो. हे ओळखूनच राणे यांनी कोणत्याही वादात पडू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.