काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका करून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे नारायण राणे यांनी सोमवारी बंडाची तलवार काहीशी म्यान केली. एकीकडे, राजीनाम्यानंतर पुढील दिशा जाहीर करण्याचे सांगणाऱ्या राणे यांनी ‘पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यास विचार करेन’ असे सांगत राणेंनी परतीचे दोरही शाबूत ठेवले. मात्र, राणे यांच्या या नाराजीला काँग्रेसचे दिल्लीतील नेते किती महत्त्व देतात यावरच राणे यांचे भवितव्य अवलंबून आहे.
राजीनाम्याची घोषणा केल्यावर गेले दोन-तीन दिवस कोकण दौऱ्यात राणे आक्रमक झाले. पण हा आवेश राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिसला नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारल्यावर पुढील दिशा जाहीर करीन, असे सांगणाऱ्या राणे यांनी राजीनामा स्वीकृत न झाल्यास काय करणार, यावर जर-तरला उत्तर देणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. पक्षाने २००९ मध्ये प्रदेशाध्यक्षपद किंवा प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शविली होती, पण आपणच तेव्हा ही पदे स्वीकारली नव्हती, असे ते म्हणाले. आता कोणती महत्त्वाची जबाबदारी सोपविल्यास काय, यावर ‘बघू’ एवढेच उत्तर दिले.

चेंडू काँग्रेसच्या कोर्टात
राजीनाम्यानंतर राणे यांनी काँग्रेसने शब्द पाळला नसल्याचा पुनरुच्चार केला. पक्षात प्रवेश देताना आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण ते पाळण्यात आले नाही, असा दावा केला. राणे यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेले हे आव्हानच मानले जाते. इतर पक्षांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध असल्याचे सांगत राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर दबाव वाढविला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून राणे यांना कितपत गांभीर्याने घेतले जाते यावर बरेच अवलंबून आहे.
एकही आमदार उपस्थित नाही
राजीनाम्याची घोषणा करण्याकरिता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी राणे यांचे काही प्रमुख समर्थक उपस्थित होते. विद्यमान आमदारांपैकी एकही याप्रसंगी उपस्थित नव्हता.

जनतेच्या हिताचे निर्णयच घेतले जात नाहीत. निर्णय झाले तरी त्याची अंमलबजावणी दोन-दोन वर्षे होत नाही. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर मुख्यमंत्री चव्हाण काही निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. तसे काहीच झाले नाही. केवळ मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ असून काय उपयोग? शेवटी जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत.    
नारायण राणे

नारायण राणे दावा करीत आहेत की त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आले होते. एकाच पदासाठी असा आग्रह धरणे योग्य नाही. राणेंना फक्त मुख्यमंत्रिपद हवे आहे; त्याशिवाय काहीही नको. थोडक्यात त्यांच्या म्हणण्यानुसार नेतृत्वबदल व्हावा. काँग्रेसमध्ये असे होत नाही. उलट अशा मागण्यांमुळे पक्ष कमकुवत होतो.  
   – अभिषेक मनू संघवी,
काँग्रेस प्रवक्ते.
.. तर राणेंचे उद्योग बाहेर काढू!
राणेंना आस हकालपट्टीची!