मोदी सोलापुरात तर शहा यांचा नागपूर, लातूर, सांगली दौरा

मुंबई : लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपला २३ तर रालोआला ४२ जागा देणाऱ्या महाराष्ट्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. महिनाभरात दोघेही पुन्हा महाराष्ट्राला भेट देत असून पंतप्रधान मोदी नऊ जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, तर अमित शहा जानेवारीत तीन वेळा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून त्यापैकी ४२ जागा लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांना मिळाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता गमावल्यानंतर आता या तीन राज्यातील लोकसभेच्या जिंकलेल्या जागांवर काही प्रमाणात परिणाम होणार असा अंदाज आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने लागोपाठ यश मिळवले. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्रावर मोदी-शहा यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात १०० ठिकाणी सभा घेणार आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच मोदी यांनी कल्याण-पुणे शहरांचा दौरा केला. आता नऊ जानेवारी रोजी ते सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. विशाल गृहनिर्माण प्रकल्पासह विविध कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. तर अमित शहा जानेवारी महिन्यात लातूर, नागपूर व सांगलीचा दौरा करणार आहेत. त्यामाध्यमातून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांचा आढावा अमित शहा घेतील. मोदी व शहा यांच्या या दौऱ्यांमुळे भाजपची पक्षसंघटना सक्रीय होईल आणि शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो ती लढण्यासाठी पुन्हा सज्ज होईल, असा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.