टीआरपी घोटाळा

‘न्यूज नेशन’सह अन्य वाहिन्यांचा देशपातळीवरील वितरक आशीष चौधरी याला टीआरपी घोटाळ्यात गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

आतापर्यंतच्या तपासात आशीषची अटक महत्त्वाची असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. टीआरपी वाढविण्यासाठी घोटाळ्यात सहभागी प्रत्येक वाहिनीतर्फे आशीष दर महिन्याला पाच लाख रुपये अन्य आरोपी अभिषेक कोळवडे याला देत होता. यातील काही रक्कम रोख तर काही रक्कम आशीषच्या ‘क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या खात्यावरून धनादेशाद्वारे वितरित होत होती. आशीषने अभिषेकला स्वाक्षरी केलेले कोरे धनादेशही दिले होते. हे धनादेश अभिषेक स्वत:च्या कंपनीतील कामगारांच्या नावे वठवून घेत असे. ही सर्व रक्कम अभिषेक आपल्या साथीदारांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवत होता, असे सांगण्यात आले.

वॉव म्युझिकचाही सहभाग

* अटक आरोपी आशिष याने २०१७ पासून ऑगस्ट २०२० पर्यंत ‘वॉव म्युझिक’ आणि ‘रिपब्लिक भारत’(रिपब्लिकची हिंदी वहिनी) या वाहिन्यांचे टीआरपी वाढविण्यासाठी अभिषेक कोळवडे याला दरमहा १० लाख रुपये दिल्याचे आर्थिक तपासणीतून स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

हवालाद्वारे आर्थिक व्यवहारांचा संशय

* आशीषने केलेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये हवाला माध्यमाचा वापर झाल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे विशेष पथकाचे प्रमुख सचिन वाझे यांनी सांगितले.

महामुव्हीच्या प्रमुखांना समन्स

घोटाळ्यात सहभाग स्पष्ट झालेल्या महामुव्हीज वहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विपणन विभाग प्रमुख आदी अधिकाऱ्यांना विशेष पथकाने समन्स जरी करून गुरुवारी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्यासोबत घोटाळ्यात सहभागी वाहिन्यांच्या गुंतवणूकदारांकडेही चौकशी होणार आहे, असे सांगण्यात आले.

माफीचा साक्षीदार

अटक आरोपींपैकी एकाने टीआरपी घोटाळ्यात माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा वकिलामार्फत गुन्हे शाखेकडे व्यक्त केली. या आरोपीने घोटाळ्यात सहभागी निम्म्या साखळीबाबत नेमकी माहिती विशेष पथकाला दिली आहे.