पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात ‘नाटय़रंग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात प्रायोगिक, व्यावसायिक, संगीत तसेच बालनाटय़े सादर होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजता अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या नाटय़ प्रयोगांना रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
महोत्सवाची सुरुवात राज्य नाटय़ स्पध्रेतील पारितोषिक विजेत्या ‘शेक्सपियर गेला उडत’ या नाटकाने होणार असून त्याच दिवशी उदयोन्मुख नाटककारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आविष्कार’ संस्थेने आयोजित केलेल्या ‘नाटककारांच्या शोधात’ या उपक्रमांतर्गत लिहिलेले ‘अस्वस्थ समुद्रावर बल मेलाय!’ हे नाटक सादर होणार आहे.
६ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘मानाची’ लेखक संघटना आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पध्रेतील ‘बॉम्ब चिकि चिकि बॉम्ब’ ही पारितोषिकप्राप्त एकांकिका तर सायंकाळी ६.३०वाजता हिंदी रंगभूमीवर विशेष गाजत असलेले रंगबाज संस्थेचे ‘बडे मियाँ दिवाने’ हे हिंदी नाटक सादर होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राजू तुलालवार यांची ‘मिकी माउस’ ‘छोटय़ा भीमची धम्माल’ आणि ‘फुग्यातला राक्षस’ ही बालनाटय़े सादर होणार आहेत.
दुपारी बारा वाजता राज्य बालनाटय़ स्पध्रेत प्रथम आलेले ‘डराव डराव’ हे नाटक तर दुपारी चार वाजता ‘संगीत जय जय गौरी शंकर’ हे संगीत नाटक होणार आहे.
महोत्सवाची सांगता झी गौरव सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणाऱ्या ‘गोष्ट एका शाळेची’ या नाटकाने होणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर रसिकांना प्रवेश दिला जाणार आहे. जास्तीतजास्त नाटय़रसिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने केले आहे.