राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप; मतांच्या राजकारणासाठी खटाटोप

ठाणे : भिवंडी-कल्याण या मेट्रोसाठी निविदा काढण्यात आलेली नसतानाही या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच केवळ भाजप खासदाराचा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली आहे. मात्र प्रवासी संख्येच्या दृष्टिकोनातून ही मार्गिका चुकीची असल्यामुळे हा प्रकल्प तोटय़ाचा ठरणार असल्याचा दावाही राष्ट्रवादीने केला आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने ही मेट्रो भिवंडीकडे वळवून शिवसेनेवर एकप्रकारे कुरघोडी केल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी मेट्रो भूमिपूजनाच्या पाश्र्वभूमीवर  शासनाच्या कारभारावर टीका केली. काल्हेर-भिवंडी भागातील आणि कळवा-मुंब्रा, दिवा, डोंबिवली भागातील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करून मेट्रो मार्गिका कापुरबावडीमार्गे कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली अशी करायला हवी होती. ही मेट्रो सेवा मध्य रेल्वेशी संलग्न असती तर लाखो प्रवाशांना त्याचा फायदा झाला असता. मात्र मतांच्या राजकारणासाठी भाजप खासदाराच्या मतदारसंघातून मेट्रो नेण्यात आली आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. भिवंडीकरांनी कधीच मेट्रोची मागणी केलेली नसून त्यांनी चांगले रस्ते, पाणी, शौचालये अशा मूलभूत गरजा पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून याठिकाणी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा, ठाकुर्ली, कोपर, डोंबिवली या भागांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून या भागातील रेल्वे प्रवाशांनी मेट्रोची मागणी केलेली आहे. तरीही केवळ राजकीय हेतूने हा मार्ग भिवंडीमध्ये वळवण्यात आला असून या प्रकल्पासाठी कोणतीही निविदा काढलेली नाही अशी टीका पक्षाने केली आहे.