मुंबई : या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या नगरपालिका नंतर महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक भक्कम करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिला असून, येत्या २८ तारखेपासून ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील ८२ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भेट देऊन कार्यकत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

पुढील गुरुवारपासून गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघापासून या अभियानाची सुरुवात होईल. १४ जिल्ह्यांमधील ८२ मतदारसंघांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दौरा करणार आहेत. दौरा करणार असलेले मतदारसंघ हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे आहेत. फक्त काही ठरावीक मतदारसंघ निवडण्यात आलेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट के ले.

पक्षाकडून नेहमीच शेवटच्या कार्यकत्र्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच स्थानिक नेते व कार्यकत्र्यांशी संवाद साधणे आणि त्यांचे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न या परिवार संवादातून करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाचा पाया अधिक विस्तारणे व नवीन कार्यकर्ते जोडणे हा या अभियानाचा उद्देश असेल.

पहिल्या टप्प्यात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.

‘राज्यपालांनी नियुक्त्या लवकर कराव्यात’

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी महाविकास आघाडी सरकारने सादर करून दोन महिने उलटले तरी राजभवनने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी या नियुक्त्या लवकर करणे आवश्यक आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त के ले.  विधान परिषदेवरील १२ सदस्यांची मुदत गेल्याच वर्षी संपली.