शकुन-अपशकुनाला कालबाह्य़ ठरवणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे-पांडुरंग फुंडकर-अनिल बोंडे यांना लाभदायक न ठरलेल्या ६०२ क्रमांकाच्या दालनात उपमुख्यमंत्री कार्यालय थाटण्याचे टाळले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या दालनाला अजित पवार यांनी पसंती दिली असून तेथे उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

युती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद ठेवले नव्हते. त्यामुळे ६०२ क्रमांकाचे दालन ज्येष्ठ नेते व तत्कालीन महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आले. त्यानंतर एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कृषीमंत्रीपदाची धुरा भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्यावर सोपवण्यात आली व त्यांना खडसे यांचे दालन देण्यात आले. त्यानंतर काही काळाने फुंडकर यांचे निधन झाले. विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला.

त्यात अनिल बोंडे यांना कृषीमंत्रीपद व ६०२ क्रमांकाचे ते दालन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांचा पराभव झाला. लागोपाठ तीन मंत्र्यांना लाभदायक न ठरल्याने ते दालन मंत्रालयात व राजकीय वर्तुळात कुप्रसिद्ध झाले.

या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. जो उपमुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत नाही असे म्हटले जायचे. तरीही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या अजित पवार यांनी २०१० मध्ये उपमुख्यमंत्रीपद घेतले होते. उपमुख्यमंत्र्यांना सहाव्या मजल्यावरच कार्यालय देण्याची प्रथा आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार  ते ६०२ क्रमांकाचे दालन स्वीकारणार का याबाबत उत्सुकता होती. पण त्यांनी ते दालन टाळले आहे.

सीताराम कुंटे यांचे दालन सहाव्या मजल्यावरच असून उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी पुरेशी जागा त्या ठिकाणी आहे. अजित पवार यांनी त्या दालनाला पसंती दिल्याने उपमुख्यमंत्री कार्यालय त्या ठिकाणी थाटण्यासाठी पाहणी केली. कुंटे यांचे कार्यालय ६०२ क्रमांकाच्या दालनाच्या जागेवर जाईल. तसेच मुख्यमंत्री मदत कक्षही त्याठिकाणी उभारण्याच्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अजित पवार यांनीही माध्यमांशी बोलताना कुंटे यांच्या दालनाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री कार्यालय असेल, असे सूतोवाच केले. कुंटे यांचे दालन मुख्य सचिवांच्या दालनाच्या जवळ आहे. आता मुख्य सचिवांचे दालन हे मुख्यमंत्री कार्यालय व उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मध्ये येईल. दोन्हीकडून आदेश येऊन लोकांची कामे लवकर होतील, अशी कोपरखळीही अजित पवार यांनी मारली.