भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून आम आदमी पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले असतानाच अंजनी दमानिया आणि मयांक गांधी या आम आदमी पार्टीच्या दोन नेत्यांवर राष्ट्रवादीने प्रतिहल्ला चढविला आहे. मयांक गांधी हे बिल्डरांचे दलाल असल्याचा थेट आरोपच राष्ट्रवादीने केला.
आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत वरळीच्या नॅशनल स्पोर्टस क्लबमध्ये काही बिल्डरांची बैठक झाली. मयांक गांधी यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत निवडणूक निधी मिळविण्यासाठी चर्चा करण्यात आली. काही बिल्डरांच्या उपस्थितीत काय चर्चा झाली हे आम आदमी पार्टीने स्पष्ट करावे, असे आव्हानच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले. पक्षाने मुंबईत उमेदवारी जाहीर केलेले मयांक गांधी यांनी लोक ग्रुप आणि रिमेकिंग ऑफ मुंबई या संस्थेच्या माध्यमातून अनेक घोटाळे केल्याचा आरोपही मलिक यांनी केला.  
दमानियांच्या पतीची जागा रायगड जिल्ह्यातील कोंढाणे जलाशय परिसरात आहे. आपली जमीन पाण्याखाली जाऊ नये म्हणून बुडित क्षेत्र बदलावे म्हणजे आदिवासींच्या जमिनी पाण्याखाली जातील असे पत्रच दमानिया यांनी पाटबंधारे खात्याला दिले होते याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. खोटी माहिती सादर करून अंजनी दमानिया यांनी आपण शेतकरी असल्याचे पुरावे दिले आणि जमीन खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला़