News Flash

कृषी कायद्यांविरोधात शरद पवार आक्रमक; शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन

संग्रहित (PTI)

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर अद्यापही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून कोणताही तोडगा निघालेला नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार हे २५ जानेवारी रोजी आंदोलनात सहभागी होतील असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर ५२ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू असूनही केंद्र सरकार संवेदनशीलता दाखवत नाही. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत असून आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी के ले आहे.

याआधीही नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली होती. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलक शेतकऱ्यांच्या लढय़ाला पाठिंबा देतील, असं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. “आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्याच्या विचाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी होकार दिला आहे. आठवडाभरात हा मोर्चा काढण्याचे नियोजन असून एक-दोन दिवसांत त्याच्या तपशिलाबाबत अंतिम निर्णय होईल. करोनाविषयक नियम पाळून हा मोर्चा काढण्यात येईल,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

“केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत. तिन्ही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचा अर्थ न्यायालयाने एक प्रकारे मोदी सरकारला वेळ देत हा विषय मिटवण्याचा संदेश दिला आहे; पण मोदी सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचे दिसत नाही,” अशी टीकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 7:17 pm

Web Title: ncp sharad pawar to attend protest over farm laws in mumbai sgy 87
Next Stories
1 मुंबईतील धक्कादायक घटना, पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा
2 लसीकरण पुन्हा सुरू!
3 देवाच्या दारात अंतर नियम पायदळी
Just Now!
X