05 July 2020

News Flash

कपाळकरंटे आम्ही!

गुजरातेतील गिरनार येथे असलेला सम्राट अशोकाच्या राजाज्ञेचा शिलाखंड हा भारताच्या इतिहासातील सर्वात जुना लिखित स्वरूपातील पुरावा आहे. सुमारे २३०० वर्षे उन्हापावसाचे आणि निसर्गाचे अनंत तडाखे

| July 19, 2014 06:24 am

गुजरातेतील गिरनार येथे असलेला सम्राट अशोकाच्या राजाज्ञेचा शिलाखंड हा भारताच्या इतिहासातील सर्वात जुना लिखित स्वरूपातील पुरावा आहे. सुमारे २३०० वर्षे उन्हापावसाचे आणि निसर्गाचे अनंत तडाखे सहन करूनही हा शिलाखंड आजवर ताठ मानेने उभा होता. या शिलाखंडाचे संरक्षण व्हावे म्हणून काही वर्षांपूर्वी त्याच्याभोवती एक संरक्षक वास्तू बांधण्यात आली. दैवदुर्विलास असा की, कठोर काळापुढे हार न मानलेल्या या शिलाखंडाला सरकारी वास्तूपुढे मात्र सपशेल हार पत्करावी लागली आहे. काही दिवसांपूर्वी ही संरक्षक वास्तूच जीर्ण होऊन शिलाखंडावर कोसळल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
भारतीय परंपरा ही मौखिक स्वरूपाची आहे. आपल्याला लिखित पुरावे सापडतात, ते सम्राट अशोकाच्या कालखंडापासून. त्यातही गिरनारचा हा शिलाखंड सर्वात प्राचीन लिखित पुरावा मानला जातो. या शिलाखंडावर सम्राट अशोकाच्या राजाज्ञा ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेल्या आहेत. या राजाज्ञा म्हणजे समाजाला दिलेली एक प्रकारची नैतिक शिकवणच आहे. या एकूण १४ राजाज्ञांमध्ये प्राणीहत्या करू नका, तीर्थक्षेत्रांना भेटी द्या, अनैतिक वर्तन करू नका, आई- वडिलांशी व समाजातील ज्येष्ठांशी चांगले वागा आदींचा समावेश आहे. असे न वागणाऱ्यास कडक शासन करण्याचे सूतोवाचही यामध्ये करण्यात आले आहे. समाजाच्या नैतिक शिक्षणासाठी धर्म अमात्य नेमण्याची तरतूदही त्यात आहे. त्याचप्रमाणे माणसांसाठी व प्राण्यांसाठी रुग्णालये उभारावीत, औषधी वनस्पतींचे उत्पादन करावे आदी राजकर्तव्यांचाही उल्लेख त्यात आहे. भारतीय इतिहासामध्ये या शिलाखंडाला सर्वाधिक महत्त्व आहे. कारण तोच भारतीय इतिहासाचा पहिला लिखित पुरावा आहे. किंबहुना म्हणूनच त्याची प्रतिकृती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आली आहे.
काही वर्षांंपूर्वी या शिलाखंडाच्या संरक्षणासाठी एक वास्तू उभारण्यात आली. मात्र पुरातत्व खात्याच्या नेहमीच्या गलथान कारभारानुसार या वास्तूकडेच अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या वास्तूची डागडुजी होणे अपेक्षित होते. मात्र सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाची परिणती अखेरीस ज्याचे संरक्षण करायचे त्या शिलाखंडावरच कोसळण्यात झाली.
पुरातत्त्व विज्ञानाच्या क्षेत्रात या दुर्घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई विद्यापीठातील बहि:शाल शिक्षण विभागाच्या सेंटर फॉर आर्किऑलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक व प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. कुरुष दलाल या संदर्भात म्हणाले की, हा केवळ गुजरातच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील सर्वात जुना लिखित पुरावा आहे. मौर्य साम्राज्य किती दूरवर पसरलेले होते, त्याची कल्पनाही या राजाज्ञेवरून येते. सम्राट अशोकाच्या वडिलांनी या शिलाखंड परिसरात बांधलेल्या सुदर्शन तलावाच्या दुरुस्तीचा रुद्रदमन या तत्कालीन अन्य राजाने केलेला उल्लेखही याच शिलाखंडावर आहे. त्यामुळे इथे सम्राट अशोक, रुद्रदमन आणि स्कंदगुप्त अशा तिघांचेही शिलालेख एकाच शिलाखंडावर असल्याने याला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.  या शिलाखंडाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ‘आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’कडे आहे. मात्र सध्या तिथे संवर्धनाच्या नावाखाली केवळ पैशांची लूट सुरू असून त्याचीच परिणती संरक्षणाची वास्तूच संरक्षित वास्तूवर कोसळण्यात झाली. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी.’
पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित म्हणाले की, भारतीय इतिहासाच्या सर्वात जुन्या लेखी पुराव्याकडे आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे झालेले हे दुर्लक्ष्य केवळ अक्षम्य आहे. हा सर्वात चांगला राहिलेला अतिप्राचीन शिलाखंड होता. त्याची तातडीने दुरुस्ती व्हायलाच हवी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2014 6:24 am

Web Title: negligence to ashokas 2300 year old rock edicts
Next Stories
1 उर्दू बालभारतीला मराठी मातीतील सुधारकांचे वावडे
2 पुणे स्फोट केल्याचा काश्मिरी तरुणाचा दावा
3 गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या आणखी गाडय़ा
Just Now!
X