राज्यात यापुढे नवीन रस्त्यांवर लहान वाहनांना पथकर (टोल) आकारला जाणार नाही, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या नाक्यांवरील पथकर रद्द करण्यासंदर्भात विविध पर्यायांवर विचार सुरु असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट
केले.
कोणत्याही नवीन रस्त्याचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून करार करतानाच ज्याप्रमाणे दुचाकी, रुग्णवाहिका व अन्य वाहनांना वगळले जाते, त्याप्रमाणे लहान वाहनांना वगळले जाईल. हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. स्कूलबसना पथकरातून वगळण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश लवकरच जारी केले जातील. मोठय़ा वाहनांच्या पथकरात कोणतीही वाढ होणार नाही, असे सांगून पाटील म्हणाले, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना पथकर वसुलीमध्ये फारसा त्रास होत नाही आणि सुविधाही देण्यात आल्या आहेत. लहान वाहनांना वगळल्यास सुमारे २५० कोटी रुपयांचा बोजा सरकारला सहन करावा लागेल.  
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या नाक्यांवर होत असलेल्या पथकर आकारणीतून लहान वाहनांना वगळता येईल का, या मुद्दय़ावर अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समिती अभ्यास करीत आहे. त्यांचा अहवाल पुढील महिन्यात अपेक्षित असून त्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल, असे पाटील यांनी सांगितले.