अनारक्षित तिकीट फक्त मुख्य स्थानकांवरच; तीन तासांत प्रवास सुरू करण्याचेही बंधन
एकीकडे रेल्वेचा प्रवास अद्ययावत, गतिमान करण्याची आणि रेल्वेची प्रतिमा प्रवासीअनुकूल करण्याची हमी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देत असताना प्रत्यक्षात नव्या वेळखाऊ नियमांच्या जाचात सामान्य प्रवासी भरडले जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या २०० किलोमीटर अंतरातील प्रवासासाठीच्या अनारक्षित तिकिटांबाबतचे नवे नियम सरकारने १ मार्चपासून अंमलात आणले असून त्यामुळे आधीच वेळापत्रकाच्या रूळावरून घसरत चाललेल्या आणि सोयीसुविधांबाबत आनंदीआनंद असलेल्या रेल्वे प्रवाशांना नियमबद्ध दणकाही सोसावा लागणार आहे. आता नव्या नियमांनुसार, कोणत्याही स्थानकांवरून कुठूनही कुठेही जाणाऱ्या गाडीचे अनारक्षित तिकीट काढण्याची सोय संपुष्टात आली आहे. आता ज्या स्थानकावर गाडी थांबते तिथूनच तिकीट काढता येणार आहे. त्याचप्रमाणे या तिकिटावर तीन तासांत प्रवास सुरू करणेही बंधनकारक करण्यात आल्याने अनेक मुख्य स्थानकांवरील गर्दीत प्रमाणाबाहेर वाढ होण्याची चिन्हे आहेत.
२०० किलोमीटरपुढील तिकिटे मात्र छोटय़ा स्थानकांवरूनही मिळणार आहेत. मुख्य स्थानक गाठून तिकीट काढण्याचा आटापिटा करायचा किंवा २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे तिकीट काढायचे, असे दोनच खर्चीक पर्याय प्रवाशांच्या माथी मारले गेले आहेत.
या नियमामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वेच्या तिकीट कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने तिकीट खिडक्याही कमी आहेत. कोणत्याही स्थानकावरून तिकीट काढता येत असल्याने प्रवाशांच्या वेळेवरील आणि तिकीट कर्मचाऱ्यांवरील ताणही वाचत होता. आता मुख्य स्थानकांवर गर्दीही वाढणार असून प्रवासासाठी नियोजनाचा वेळही जास्त लागत आहे, अशी टीका रेल्वे प्रवासी संघटनेचे संघटक नंदकुमार देशमुख यांनी केली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र या नियमांचे समर्थन केले आहे. २०० किलोमीटर हे अंतर खूप कमी असून तिकिटाचा गैरवापर सुरू होता. तीन तासांत प्रवास सुरू करणे अपेक्षित असताना अनेकदा प्रवासी सकाळी तिकीट काढून संध्याकाळची गाडी पकडत होते. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परतीचे तिकीटही नाही!
अनारक्षित प्रवासासाठीचे नवे नियम २४ फेब्रुवारीला संसदेत मांडण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लेखी उत्तरात सांगितल्यानुसार, अनारक्षित परतीचे तिकीटही काढता येणार नाही.
द्राविडी प्राणायाम
मुंबईहून पुणे किंवा नाशिक येथे जाण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत उपनगरीय मार्गावरील कोणत्याही स्थानकावरून प्रवासी तिकीट काढू शकत होते. मात्र आता गाडी ज्या स्थानकांवर थांबते, त्याच स्थानकांवरून ही अनारक्षित तिकिटे मिळणार आहेत.