विमानाप्रमाणे प्रवाशांचे स्वागत; सरबराईसाठी खास कर्मचारी

‘नमस्कार, मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे. संध्याकाळचे चार वाजून ३० मिनिटे झाली आहेत. मुंबई ते दिल्लीपर्यंतचे अंतर अमुक अमुक किलोमीटर असून ते पार करण्यासाठी आपल्याला अमुक अमुक तासांचा कालावधी लागणार आहे. तुमचा प्रवास सुखाचा होवो, ही भारतीय रेल्वेची सदिच्छा..’ पश्चिम रेल्वेवर राजधानी आणि दुरंतो या उच्च श्रेणीच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत अशा थाटामाटात करण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. विमानाप्रमाणे या गाडीतही प्रवाशांची सरबराई करण्यासाठी कर्मचारी नियुक्त असतील आणि त्यांच्याकडून प्रवाशांना प्रवास सुरू झाल्यापासून पाच मिनिटांमध्येच अदबशीर सेवा मिळण्यास सुरुवात होणार आहे.

बदलत्या काळाप्रमाणे आपल्यात बदल करून अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी रेल्वेने प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजधानी किंवा दुरंतो अशा उच्च दर्जाच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष असल्याची जाणीव करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने आयआरसीटीसीसह एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. राजधानी व दुरंतो या गाडय़ांच्या वातानुकूलित प्रथम आणि द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले जाणार आहे. प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी गाडीचे अधीक्षक आणि सेवा कर्मचारी व द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांसाठी सेवा कर्मचारी आणि तिकीट निरीक्षक सज्ज असतील. प्रवासाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये ते प्रवाशांना स्वत:ची ओळख करून देण्याबरोबरच पाण्याची बाटली, तोंड पुसण्यासाठी टॉवेल देतील. त्यानंतर पुढील अध्र्या तासाच्या आत प्रवाशांना खाद्यपदार्थाची सूची देऊन त्यांना जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी हव्या असलेल्या पदार्थाची यादी घेतील, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी सांगितले.प्रवाशांच्या स्वागतासाठी एक खास उद्घोषणा आयआरसीटीसीकडून ध्वनिमुद्रित करून घेतली जात आहे. ही उद्घोषणा ध्वनिमुद्रित झाल्यानंतर लगेचच ही सेवा सुरू होईल. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. दरदिवशी गाडी सुटण्याआधी पंधरा मिनिटांसाठी या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही आरती सिंह यांनी स्पष्ट केले.