तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नवे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करण्याची सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिली असून प्रथम फेरी घेण्यासाठी २० ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये घ्याव्या लागतील.

विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलैमध्ये नवे वेळापत्रक जाहीर केल्यावर परिषदेनेही अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट यांसह विविध तंत्रशिक्षण विद्याशाखांच्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. परिषदेने आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यानुसार प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या दोन नियमित फेऱ्या प्रवेश नियमन प्राधिकरणांनी पूर्ण करायच्या आहेत. द्वितीय वर्षांपासून पुढील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू होईल.

नवा प्रश्न..

सध्या राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाला विरोध करत युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होऊ शकत नाहीत, अशी भूमिका राज्य शासन मांडत असताना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये घेणार का, हा नवा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामायिक प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये?

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा प्रवेश नियमन प्राधिकरणाने पुढे ढकलल्या. या परीक्षांचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येत्या आठ दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी घोषणा नुकतीच केली आहे. आता परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबरमध्ये प्रथम वर्षांची प्रवेश परीक्षा पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाला सप्टेंबरमध्ये सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन तातडीने निकाल जाहीर करावे लागणार आहेत.

वेळापत्रक

* शैक्षणिक वर्षांची सुरुवात – १ सप्टेंबर

*प्रथम प्रवेश फेरी – २० ऑक्टोबरपूर्वी

* द्वितीय प्रवेश फेरी – १ नोव्हेंबरपूर्वी

* प्रथम सत्राच्या नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात – १ नोव्हेंबर

* प्रवेश रद्द करण्याची मुभा – १० नोव्हेंबर

* रिक्त जागांवर प्रवेश – १५ नोव्हेंबपर्यंत