मुंबईत १३ वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यामध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र या बाळाचा अवघ्या ४८ तासांत मृत्यू झाला. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास या बाळाचा मृत्यू झाल्याची बातमी ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिली आहे. मुंबईतील बलात्कार पीडित मुलीच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. मात्र तोवर बलात्कार पीडित मुलीचा गर्भ ३२ आठवड्यांचा झाला होता.

३२ आठवड्यांमध्ये गर्भाची पुरेशी वाढ झालेली असते, त्याचमुळे या मुलीचा गर्भपात न करता सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांच्या परवानगीने घेण्यात आला होता. जन्मानंतर या बाळाचे वजन १.८ किलो होते. तसेच त्याला जन्मल्यापासूनच श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्याचमुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?
मुंबईत राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांच्या मित्राने लैंगिक अत्याचार केले. मात्र याबाबत पीडित मुलीने आपल्या घरातल्यांना काहीही सांगितले नाही. या मुलीच्या लठ्ठपणावर उपचारासाठी तिला तिच्या पालकांनी डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी ही मुलगी गरोदर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुलगी गरोदर राहून २७ आठवडे उलटल्याचे पीडित मुलीच्या पालकांना समजल्याने त्यांना धक्काच बसला. हे सत्य समोर आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनी पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक केली.

गर्भपाताच्या कायद्यानुसार २० आठवडे उलटल्यानंतर गर्भपात करण्यास संमती दिली जात नाही. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समजले तेव्हा २७ आठवडे उलटले होते. याच कारणामुळे पीडित मुलीच्या आई वडिलांनी गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मागील बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

गर्भपाताला परवानगी मिळाली नसती तर मुलीच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. त्याचमुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मुंबईतील जे. जे. रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. हा अहवाल विचारात घेऊन सुप्रीम कोर्टाने पीडित मुलीच्या गर्भपातास संमती दिली.