मालेगाव बॉम्बस्फोट २००८ : ‘एनआयए’चे घूमजाव, आरोपपत्रात सहा जणांचा उल्लेख नाही; कर्नल पुरोहित यांच्यावरील आरोपही सौम्य
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी केलेला तपास योग्य असल्याचा दावा करत या प्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहच्या जामिनाला सतत विरोध करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी अचानक घूमजाव करत दिवंगत हेमंत करकरे यांचा तपास चुकीचा ठरविला. यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य पाच आरोपींना आरोपमुक्त ठरवणारे पुरवणी आरोपपत्रच एनआयएने शुक्रवारी विशेष न्यायालयात सादर केले. एवढेच नव्हे, तर बॉम्बस्फोटाचा आणखी एक मुख्य सूत्रधार कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह दहा जणांना एनआयएने दोषमुक्त केले नसले तरी त्यांच्यावरील कठोर असा ‘मोक्का’ हटवत केवळ भादंवि आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. यामुळे अटकेपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहितांचा जामिनावर सुटण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.
२००८चा मालेगाव स्फोटाचा कट रचल्याचा आणि त्याची अंमलबजावणी केल्याचा साध्वी प्रज्ञासिंह तसेच अन्य पाच आरोपींवर ठेवलेला आरोप सिद्ध करणारा एकही ठोस पुरावा तपासादरम्यान पुढे आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवणे योग्य होणार नाही, असा दावा करत ‘एनआयए’ने शुक्रवारी विशेष न्यायालयात या सहा आरोपींच्या नावाचा समावेश नसलेले पुरवणी आरोपपत्र सादर केले. साध्वीसह शिवनारायण कलसंगरा, श्याम भवरलाल साहू, प्रवीण टक्काल्की, लोकेश शर्मा आणि धनसिंह चौधरी यांच्यावरील सर्व आरोप ‘एनआयए’ने मागे घेतले आहेत. शिवाय हे प्रकरण संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत येत नाही. त्यामुळे कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवर ‘मोक्का’ लावला जाऊ शकत नाही, असेही ‘एनआयए’तर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, खून करणे या भादंविच्या मुख्य कलमांसह बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा आणि स्फोटके कायद्यानुसार खटला चालवण्यात येणार आहे. शिवाय ‘मोक्का’अंतर्गत ‘एटीएस’ने आरोपींचे नोंदवलेले जबाबही ‘एनआयए’च्या अंतिम तपास अहवाल व पुरवणी आरोपपत्रानुसार कुचकामी झाले आहे. २९ सप्टेंबर २००८ साली मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. रमझानच्या अज़ाननंतर मशिदीबाहेर पडलेल्या सात जणांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. त्या वेळेस राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे नेतृत्व करणारे हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. हा स्फोट मुस्लीम दहशतवादी संघटनेने नव्हे, तर हिंदूू दहशतवाद्यांनी घडवल्याचा गौप्यस्फोट करत या स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. साध्वी आणि पुरोहित यांच्यासह एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करणाऱ्या एटीएसने आरोपपत्र मात्र १४ जणांविरोधातच दाखल केले होते. ‘मोक्का’ हटवण्याबाबत स्वत: साध्वी प्रज्ञा हिने उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात अनेकदा याचिका केल्या. त्याचदरम्यान एटीएसकडून प्रकरणाचा तपास काढून घेण्यात येऊन तो ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला होता.

सालियान यांचा आरोप खराच!
मालेगाव स्फोटांतील आरोपींबाबत मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट या प्रकरणातील विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान काही महिन्यांपूर्वी केला होता. तेव्हा सालियान यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा ‘एनआयए’ने केला होता. परंतु शुक्रवारी ‘एनआयए’ सालियान यांचा आरोप खरा होता हेच पुरवणी आरोपपत्रातून सिद्ध केले.

साध्वी प्रज्ञासिंह, शिवनारायण कलसंगरा, श्याम भवरलाल साहू, प्रवीण टक्काल्की, लोकेश शर्मा आणि धनसिंह चौधरी यांच्यावरील सर्व आरोप मागे. तर मुख्य सूत्रधार कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह दहा जणांवरील आरोप सौम्य.
यूपीए सरकारने राजकीय लाभासाठी तपास यंत्रणांवर दबाव आणून हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुढे आणला होता. मात्र भाजप सरकार यंत्रणांच्या तपासात कोणताही हस्तक्षेप करत नाही.
– किरण रिजिजू, केंद्रीय गृहराज्यमंत्री

पोलीस तसेच एनआयएच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघ परिवाराच्या लोकांना वाचवण्याचा पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळ प्रयत्न करीत आहे.
– दिग्विजय सिंग, कॉंग्रेस नेते