राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मुद्द्यावरून आता मुंबईत पुन्हा एकदा राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. पेंग्विन पिंजर्‍याचे बांधकाम व द. कोरियातून पेंग्विन आणणाऱ्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक तन्मय शाह याची आदित्य ठाकरे यांच्याशी मैत्री असल्याचा आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनच्या पिंजऱ्याच्या होऊ घातलेल्या उद्घाटनालाही त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठी नितेश यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे  पेंग्विन प्रदश॔न काय॔कम रद्द करण्याची मागणी केली आहे. शहरात येऊन पाच महिने लोटलेल्या पेंग्विनचे अखेर सामान्यांना दर्शन होण्याची वेळ महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यातच पेंग्विन पाहण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने फेटाळला असल्याने ३१ मार्चपर्यंत हे पेंग्विन मोफत पाहता येतील. त्यामुळे पेंग्विन दर्शनाला झुंबड उडण्याची शक्यता आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून आचारसंहितेच्या काळात पेंग्विनच्या पिंजऱ्याचे उदघाटन केले जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळेच नितेश यांनी या उद्घाटनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात ‘सामना’ रंगण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांपूर्वी हम्बोल्ट पेंग्विन आणण्याचा निर्णय घेतला गेल्यापासून आतापर्यंत पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विविध वादात अडकलेल्या पेंग्विनच्या कक्षाचे काम आता अंतिम टप्प्यात असून साधारण महिन्याभरात हे पेंग्विन सर्वसामान्यांना दर्शन देण्यासाठी तयार होतील. मात्र तोपर्यंत आचारसंहिता लागू होणार असल्याने या कार्यक्रमाला राजकीय पक्षांना उपस्थित राहता येणार नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेंग्विन दर्शनाचे श्रेय घेण्याची शक्यता मावळल्याने निवडणुकीपर्यंत ते किमान मोफत राहील याची काळजी महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने घेतली आहे. मोठय़ांसाठी शंभर रुपये तर १२ वर्षांखालील लहानांसाठी ५० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. सुरुवातीला केवळ लहान मुलांना पेंग्विनकक्ष पाहता येईल. दरम्यान, या शुल्कावरूनही नितेश यांनी शिवसेनेवर टीका केली होती. सत्ताधारी सेनेच्या पुढाकाराने हे पेंग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह विरोधक सुरूवातीपासूनच या निर्णयावरून सेनेला लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टामुळेच राणीच्या बागेतील पेंग्विनचा मृत्यू झाला, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली होती.